रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणार व आजूबाजूच्या गावांमध्ये प्रस्तावित असलेल्या केंद्र सरकारच्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी रिफायनरी विरोधी शेतकरी-मच्छीमार समितीच्यावतीने गुरुवारी एकदिवसीय राजापूर बंदची हाक देण्यात आली होती. त्याला राजापुरकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आज कडकडीत बंद पाळला.राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात ग्रीन रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र, या प्रकल्पाला परिसरातील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या विरोधानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प नियोजनस्थळीच होणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे हा विरोध आणखीनच वाढला आहे. ग्रामस्थांनी घेतलेल्या भूमिकेला शिवसेनेनेही पाठिंबा दिला असून, प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांसमेवत राहण्याचे शिवसेनेने ठरविले आहे.शिवसेनेच्या पाठिंब्यानंतर आज राजापुरात बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राजापुरातील दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. बंदच्या दरम्याने कोणताहीअनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला होता.
रिफायनरीविरोधात राजापुरात बंद, समितीची एकदिवसीय बंदची हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 5:05 AM