रत्नागिरी: राजापूर तालुक्यातील प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला आहे. त्याला समर्थन देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी हे रत्नागिरीला येणार आहेत. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करण्यास शेट्टी यांना बंदी हुकूम जारी करण्यात आला आहे. तरीही आपण बारसूला जाणारच, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
राजू शेट्टी यांनी सांगितले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यात येण्यास बंदीहुकूम घालण्यासाठी पोलिस मला शोधताहेत पण मी बारसूला जाणारच. कोणताही कायदा मला अडवू शकत नाही. अनेक नेत्यांना त्यांनी रत्नागिरीत यायला बंदी घातलेली आहे. मलाही रत्नागिरीचे पोलीस शोधत असल्याचे कळले.
माझ्यावर रत्नागिरी जिल्ह्यात यायची बंदी असल्याचा हुकूम बजावण्यासाठीच ते येताहेत. ज्यावेळी आम्हाला जायचं असेल तेव्हा कुठलाही कायदा, कुठलीही बंदी आम्हाला अडवू शकत नाही. आम्ही रत्नागिरीत गेल्यानंतरच तुम्हाला कळेल की आम्ही तिथे पोहोचलो आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. उद्योगपतींच्या सुपाऱ्या घेऊन अशा प्रकारे स्थानिकांवर दडपशाहीचा वरंवटा फिरवून जर सरकार प्रकल्प लादत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.