रत्नागिरी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे आपण रिपब्लिकन पार्टीसाठी विधानसभेच्या १८ जागांची मागणी केली आहे. त्यातील १२ जागा आम्हाला मिळतील, अशी अपेक्षा आहे. जर आम्हाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळाले तर त्याचा फायदा महायुतीमधील तीनही पक्षांना निश्चितच होईल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केला.रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेमध्ये ते पुढे म्हणाले, मागील लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. संविधान बदलाचा मुद्दा धरून विरोधकांनी खोटा प्रचार केला. मराठा आंदोलनाचाही फटका महायुतीला बसला. परंतु, येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला चांगले यश मिळेल. या निवडणुकीत रिपाइंला योग्य प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेचा महायुतीला मोठा फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षण हवे, पण..मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. १० टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. पण, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने पुन्हा विचार करावा. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, पण मराठ्यांनाही आरक्षण मिळाले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.अजित पवार नसते तर..महायुतीमध्ये उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद द्यावे, असेे आपण युतीच्या नेत्यांना सांगितले होते. जर ते दिले असते तर आज अशी परिस्थिती नसती, तसेच महायुतीमध्ये अजित पवार सहभागी झाले नसते तर रिपाइंला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले असते, असेही त्यांनी सांगितले.
‘एक निवडणूक’ला पाठिंबालोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्यासाठी ‘एक देश आणि एक निवडणूक’ याला रिपाइंचा पाठिंबा असल्याचे सांगितले. तसेच स्वातंत्र्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित झाल्या होत्या. विरोधकांनीही याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.