दापोली : रामदास कदम हा राजकारणातून संपलेला माणूस आहे, उद्धव ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय त्यांना राजकारणात कोणी विचारणार नाही याची त्यांना पुरेपूर कल्पना आहे. म्हणूनच जळी, स्थळी, पाषाणी त्यांना उद्धव ठाकरे दिसत आहेत. सरकार त्यांचे आहे, आमदार योगेश कदम यांच्या अपघाताची चौकशी करावी, जो दोषी असेल त्याला योग्य ती शिक्षा करावी; परंतु, केवळ सनसनाटी निर्माण करायची, खोटे आरोप करायचे आणि राजकारणात चर्चेत राहायचे एवढेच रामदास कदम करत आहेत, असा आरोप माजी परिवहनमंत्री अनिल परब यांनी दापोलीत केले.साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परब गुरुवारी (१२ जानेवारी) न्यायालयात हजर होण्यासाठी दापोलीत आले हाेते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राजकारणात कोणीतरी आपल्याला सतत विचारत राहावे, म्हणून माझ्यावर व उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सतत सुरू आहे.
रामदास कदम यांचा मुलगा २०१९ ला निवडून आला. त्यावेळी मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. मी पालकमंत्री असताना सर्वाधिक निधी आमदार योगेश कदम यांना दिला. याबाबत खात्री करायची असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घ्या, असे परब म्हणाले; परंतु, केवळ आपले महत्त्व वाढवून घेण्यासाठी अनिल परब यांनी माझ्या मुलाचे करिअर बरबाद केले म्हणून ओरड करायची, ही त्यांची जुनीच सवय असल्याचे अनिल परब म्हणाले.रामदास कदम यांनी आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा झालेला अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. संशयाची सुई माजी मंत्री अनिल परब यांच्या दिशेने होती. त्याबाबत त्यांना विचारले असता, रामदास कदम यांच्या बोलण्याला कोणताही अर्थ नसल्याचे सांगितले. तसेच त्यांचे सर्व आराेप अनिल परब यांनी फेटाळून लावले. सरकार त्यांचे असून, त्यांनी चाैकशी करावी. दाेषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, असे परब म्हणाले.