चिपळूण : पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून अखेर राष्ट्रवादीचे चिपळूणचे माजी आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षाचा एक नेता शिवसेनेला सहकार्य करीत आहे आणि हे पक्षश्रेष्ठींना कळवूनही ते त्याची दखल घेत नाहीत, अशी खंत व्यक्त करून रमेश कदम यांनी सोमवारी पक्षातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मनधरणी केली तरी आता पक्षात परत जाणार नाही, असेही त्यांनी घोषित करून टाकले आहे. येत्या दोन दिवसांत कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपण पुढील दिशा जाहीर करू, असे ते म्हणाले.नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या एका नेत्याने विरोधात काम करून, शिवसेनेच्यावतीने उमेदवार उभे केल्यामुळे राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली. याबाबतही पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. पक्षात होणाऱ्या या घुसमटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी आपल्या निवासस्थानी रमेश कदम यांनी पत्रकार परिषद घेतली. पदाचा राजीनामा आपण पक्षश्रेष्ठींकडे दोन दिवसांपूर्वी दिला आहे. या राजीनाम्याबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दूरध्वनी करून मनधरणी करण्याचा प्रयत्न केला तरीही आपण राजीनाम्याच्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ ला झाली. तेव्हापासून पक्षवाढीसाठी अहोरात्र परिश्रम घेतलेल्या आपल्यासारख्यांची व आपल्याबरोबर काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांची पक्षात गळचेपी होत आहे. पक्षविरोधी काम करणाऱ्या नेत्यांवर पक्ष कोणतीच कारवाई करीत नाही. त्यामुळे आपली पक्षाला आता आवश्यकता नाही, अशी आपली ठाम खात्री झाली आहे. म्हणून आपण पक्ष सदस्यत्वाचा व सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा पत्राद्वारे देत आहे, असे ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एका नेत्याने विरोधात काम केले. त्यामुळे रमेश कदमांचा पराभव झाला. हा पराभव रमेश कदमांचा नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. ज्यांनी अगदी पक्ष स्थापन झाल्यापासून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतदेखील विरोधी काम केले, त्यांना पक्षाने उलट बढती दिली. त्यामुळे सातत्याने चालत आलेल्या अंतर्गत वादामुळे पक्षाचे अस्तित्व संपत चालले आहे. नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. हे चारही नगरसेवक नगराध्यक्षांना सहकार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप माटे, हिंदुराव पवार, अविनाश हरदारे, आरपीआयचे नेते राजू जाधव, माजी नगरसेवक राजेश कदम, रोशन दलवाई, रफिक कास्कर, अजित वागळे, सावर्डेचे माजी सरपंच एकनाथ भंडारी, रियाज किल्लानी, विलास चिपळूणकर, बाबा लाड, फैसल मेमन, नवनिर्वाचित नगरसेविका वर्षा जागुष्टे, संदीप जागुष्टे, रामचंद्र मिरगल, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
माजी आमदार रमेश कदम यांचा अखेर ‘राष्ट्रवादी’ला रामराम
By admin | Published: December 26, 2016 11:50 PM