दापोली : शिवसेनेशी गद्दारी करुन जे लोक इतर पक्षात गेलेत, त्यांना भीक मागायची वेळ आली आहे. शिवसेनेमुळे जे मोठे झाले तेच लोक आता मातोश्रीवर टीका करत आहेत. मातोश्रीवर टीका करण्याची त्यांची लायकी नाही.
नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. राणे उठसूठ सेनेवर टीका करतात. राणे यांनी टीका करण्यापूर्वी त्यांनी आपली औकात काय ते पाहावे, अशी टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली.रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होण्यासाठी आपली आग्रही भूमिका असून, कोकणातील सर्व आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होण्यासंदर्भात आपण शिवसेना नेते या नात्याने आग्रही असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले.दापोलीतील कुणबी भवनात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानिमित्त पर्यावरणमंत्री दापोली आले होते. तयावेळी त्यांनी राणे यांच्यावर टीका केली.पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील फेर सर्वेत रत्नागिरी जिल्ह्यातील ९८ गावे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० गावे वगळण्यात आली आहेत. तसेच कोयनेचे ६७ टीएमसी वाया जाणारे पाणी रत्नागिरी - सिंधुदुर्ग - रायगड या तीन जिल्ह्यांना मिळण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा ठराव करुन घेत खास बाब म्हणून केंद्राकडून साडेपाच हजार कोटी रुपये मिळविण्यात येणार आहेत. आपण कोकणच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत, असेही त्यांनी सांगितले.