लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना केंद्रात मिळालेल्या कॅबिनेट मंत्रीपदामुळे रत्नागिरीतील राजकीय समीकरणांमध्येही बदल होण्याची अपेक्षा केली जात आहे. आतापर्यंत तुलनेने मर्यादित असलेल्या रत्नागिरीतील भाजपला आता संघटनात्मक ताकद वाढवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सर्वात मोठी आशा रिफायनरी समर्थकांच्या मनात निर्माण झाली आहे.
कोकणाबद्दल आस्था असलेल्या आणि कोकणाची, इथल्या गरजांची पूर्ण ओळख असलेल्या राणे यांना केंद्रात मंत्रीपद मिळणे ही बाब अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. कोकणात शिवसेनेचे प्राबल्य आहे. कोकणात आतापर्यंत कोणताही पक्ष शिवसेनेसमोर फारसा वाढलेला नाही. काँग्रेस गेल्या २५ वर्षांत टप्प्याटप्प्याने संपून गेली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची वाढ मर्यादितच आहे. शिवसेनेकडे जसे तळागाळात कार्यकर्त्यांचे जाळे आहे, तसे कोणत्याही पक्षाकडे नाही. म्हणूनच ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंत बहुतांश पदे शिवसेनेकडे आहेत.
खासदारकीसाठी इच्छुक असलेल्या माजी खासदार नीलेश राणे यांच्यासाठी नारायण राणे रत्नागिरीकडे विशेष लक्ष देतील, असे अपेक्षित आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपला नवसंजीवनी मिळेल, असा अंदाज लावला जात आहे. आतापर्यंत भाजपला समर्थ हात देणारा नेता नव्हता. सक्षम आर्थिक, राजकीय पाठबळ न मिळाल्यामुळे भाजपची वाढ मर्यादितच झाली. कोकणात शिवसेना मोठी असल्याने भाजपने आतापर्यंत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांकडे पक्षवाढीसाठी लक्षच दिलेले नाही. मात्र, आता राणे यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांची कामे होणे, कार्यकर्त्यांना काम मिळणे, कोणीतरी पाठीशी उभे राहणे या गोष्टी शक्य होणार आहेत.
भाजपने आतापर्यंत शिवसेनेचे प्राबल्य मान्य करुन नांगी टाकली आहे. शिवसेनेच्या कार्यपद्धतीला सामोरे जाण्याची मानसिकता भाजपमध्ये नाही. या दोन्ही पक्षांची काम करण्याची पद्धत पूर्ण वेगळी आहे. मात्र, नारायण राणे यांना ही पद्धत माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेला सामोरे जाण्याची, शिवसेनेला अंगावर घेण्याची भूमिका त्यांनी आतापर्यंत अनेकदा घेतली आहे. त्याचा आधार भाजपला रत्नागिरीत पक्ष वाढवण्यासाठी हाेऊ शकतो.
लोकांमध्ये फिरताना लोकांकडून सुचवली जाणारी कामे कार्यकर्ते पक्षाकडे मांडतात. ही कामे करण्यानेच पक्ष वाढत जातो. पण आतापर्यंत ही कामे करण्यासाठी रत्नागिरी भाजपकडे कोणी हक्काचा माणूस नव्हता. प्रशासकीय यंत्रणेकडून मिळणारा प्रतिसादही अशावेळी कमी असतो. ही यंत्रणाही सत्ताधारी पक्षांनाच झुकते माप देते. आता राणे यांच्या या मंत्रीपदामुळे भाजपची ती अडचणही दूर होणार आहे.
प्रकल्प समर्थकांना मोठी आशा
उद्योगांबाबत नारायण राणे नेहमीच आग्रही राहिले आहेत. त्यांनी प्रकल्पांना कायम समर्थन दिले आहे. लोकांचा विरोध असेल तर प्रकल्प योग्य कसा आहे, त्याचे फायदे काय आहेत, याची साधकबाधक चर्चा त्यांनी घडवून आणली आहे. अणुऊर्जा प्रकल्पाला टोकाचा विरोध असतानाही लोकांचे मन वळविण्यात त्यांना यश आले आहे. लोकांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यातही ते पुढे असतात. त्यामुळे रिफायनरी प्रकल्पाबाबतही ते असाच काहीसा पुढाकार घेतील, अशी आशा रिफायनरी प्रकल्प समर्थकांना वाटत आहे.