रत्नागिरी , दि. २८ : प्रतिपंढरपूर अशी ओळख असणाऱ्या रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिरातील कार्तिकी एकादशी उत्सव यावर्षी विशेष असणार आहे. प्रतिवर्षीप्रमाणे देवस्थानतर्फे परंपरागत उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आषाढी एकादशीच्या वारीला आळंदीतील ज्ञानेश्वर माऊलींचा रथ जे फुलांनी सजवतात ते विष्णू किसन आवटे हे येथील पांडुरंगाचा रथ फुलांनी सजवणार आहेत. तसेच आषाढी एकादशीच्या वारीत माऊलींच्या रथासमोर रांगोळी काढत जाणारी व गिनीज बुकमध्ये नोंद झालेली रांगोळीकार राजश्री जुन्नरकर पांडुरंगाच्या रथासमोर रांगोळी साकारत जाणार आहे.
दि. ३१ आॅक्टोबर २०१७ रोजी कार्तिकी एकादशीच्या दिवशी पहाटे २ वाजता श्रींच्या महापूजेने कार्तिकी एकादशीच्या उत्सवाला प्रारंभ होणार आहे. नगरसेवक रोशन फाळके यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाईची महापूजा करण्यात येणार आहे. तसेच मंदिरामध्ये काकड आरती व विविध भजनी मंडळांच्या भजनाने मंदिरातील वातावरण भक्तीमय होऊन जाणार आहे. तसेच रात्री १२ वाजता श्री विठ्ठलाचा रथ बाहेर पडणार आहे.
प्रतिपंढरपूर असणारे विठ्ठल मंदिर सुमारे २५० वर्षांहून अधिक पुरातन आहे. मंदिराच्या उत्सवात आवटे यांनी पुष्प सजावट करावी व राजश्री जुन्नरकर यांनी रांगोळी काढावी, अशी आमची अनेक वर्षांची इच्छा होती. ही इच्छा आम्ही या दोन्ही कलाकारांशी संपर्क साधून बोलल्यानंतर त्यांनी आमच्या इच्छेचा मान ठेवत आपल्या कलेच्या माध्यमातून पांडुरंगाची सेवा करण्याचे मान्य केले.
देवस्थानतर्फे विष्णू आवटे व राजश्री जुन्नरकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या उत्सवादरम्यान २ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता श्रींची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी देवळातून बाहेर पडणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी पहाटे काकड आरतीने उत्सवाची सांगता होईल.रांगोळीकार राजश्री जुन्नरकर ही एकादशीला रांगोळी साकारणार आहे. तिने सहा तासात ११ किलोमीटर रांगोळी साकारण्याचा विक्रम केला आहे. तिच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुकात झाली आहे. रत्नागिरीतही राजश्री विठ्ठल मंदिरापासून गवळी वाड्यापर्यंत रांगोळी साकारत जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.