चिपळूण : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुर्मीळ ग्रिफॉन गिधाडाची पहिल्यांदाच नोंद झाली आहे. शास्त्रीय व स्थलांतराच्या अभ्यासासाठी कोणत्यातरी अभ्यासकाने हे गिधाड टॅग लाऊन सोडले असल्याने त्याविषयी गंभीरपणे दखल घेत गिधाडांवर अभ्यास करणाऱ्या संशोधकांना व आंतरराष्ट्रीय संस्थांना संपर्क साधण्यात आला आहे.
या पक्ष्याचे इंग्रजी नाव ग्रिफॉन वलचर, शास्त्रीय नाव गीप्स फुल्वस असे आहे. हा एक अत्यंत मोठा पक्षी असून, त्याची उंची साधारणपणे १२५ सेंटीमीटर असते. तर दोन पंखांची लांबी साधारण ८ ते ९ फुटापर्यंत भरते. नर व मादी ग्रिफॉन गिधाडाचे वजन ८ ते १० किलोपर्यंत नोंदवले गेले आहे. ही एक दुर्मीळ गिधाड प्रजाती आहे. ज्याचे डोक्यावर पंख पांढरे शुभ्र असतात तर पाठीवरचे पंख फार रुंद व तांबूस असतात. शेपटीचे पंख हे गडद चॉकलेटी असतात. इतर गिधाडांप्रमाणेच हा स्केवेंजर अर्थात कुजलेले व सडलेले मांस खाणारा आहे.
-----------------
उंच कड्यांवर घरटे बनवतात
तिबेट, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान ते हिमालय नेपाळ, भूतान व पश्चिम चीन आणि मंगोलिया दक्षिणेकडील युरोप, उत्तर आफ्रिका येथील पर्वतांमध्ये ते प्रजनन करतात आणि एकच अंडे देतात. अलीकडेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगली जयगड भागात गस्त घालत असताना वनक्षेत्रपाल सनहेल मगर व वनरक्षक संतोष चाळके यांना हा पक्षी जंगली जयगड परिसरात उडताना घिरट्या मारताना दिसला. त्यांनी त्याला कॅमेराबद्ध केले. त्यांनी अधिक अभ्यासासाठी हा फोटो पक्षी तज्ज्ञ व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिला. फोटोमध्ये या गिधाडावर अभ्यासासाठी उजव्या पंखावर नारंगी टॅग लावलेले दिसले.
--------------------------
केरळ राज्यातील वायनाड अभयारण्यातून सोडले
युरेशियन ग्रिफाॅन गिधाड केरळ राज्यात कन्नूर जिल्ह्यातील चक्करक्कल येथे २८ डिसेेंबर रोजी दमलेल्या अवस्थेत एका घराच्या आवारात वनविभागास सापडले. पुढे औषध उपचारासाठी हे गिधाड मलबार जागरुकता आणि वन्यजीव बचाव केंद्राकडे केरळ वन विभागाच्या परवानगीने ठेवण्यात आले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे उपसंचालक तथा प्रधान शास्त्रज्ञ विभू प्रकाश (बी.एन.एच.एस. चे जटायू प्रजनन कार्यक्रम) यांच्या सल्ल्यानुसार केरळ वनविभाग तसेच केरळ येथील पक्षी तज्ज्ञ आर. रोश्नाथ व सी. सशीकुमार यांनी या गिधाडाच्या पंखाला इंग्रजी अक्षर L8 लिहिलेला नारंगी टॅग आणि पायाला रिंग लावून ३१ जानेवारी रोजी वायनाड वन्यजीव अभयारण्यामध्ये निसर्गमुक्त करण्यात आले़ त्याच्या डाव्या पायात लाल रिंग व त्यावर पांढऱ्या अक्षरात १० अंक कोरण्यात आले आहे. हा टॅग व रिंग केरळमध्ये लावल्याची माहिती मिळाली आहे.
-----------------------------
गिधाड हे शास्त्रीय व स्थलांतराच्या अभ्यासासाठी कोणत्यातरी अभ्यासकाने हे टॅग लाऊन सोडलेले आहे. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या देशात गिधाडांवर अभ्यास करणाऱ्या संशोधकांना व गिधाडांवर अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांना संपर्क करून त्यांना ह्या नोंदीची माहिती आम्ही कळवली आहे.
- नीलेश बापट, चिपळूण.