राजापूर : सह्याद्रीच्या पर्वतरांगातील हरिश्चंद्रगड (जि. अहमदनगर) परिसरामध्ये विकोआ गोखलेई या नव्या जागतिकस्तरीय फुलवनस्पतीचा शोध लागला आहे. ही फुलवनस्पती सुर्यफूल कुळातील असून, मराठीमध्ये त्याला सोनसरी असे म्हणतात. न्यूझिलंड येथून प्रकाशित होणार्या फायटोटॅक्सा या जागतिक दर्जाच्या नियतकालिकात या वनस्पतीची नोंद झाली आहे.गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच. पी. टी. आर्टस व आर. वाय. के. सायन्स महाविद्यालय, नाशिक येथील वनस्पतीशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. कुमार विनोद गोसावी त्यांचे संशोधक विद्यार्थी नीलेश माधव, रयत शिक्षण संस्थेच्या राजापूर तालुक्यातील आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अरूण चांदोरे, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. श्रीरंग यादव यांच्या दोन वर्षांच्या संशोधनानंतर या फुलवनस्पतीचा शोध लागला आहे.हरिश्चंद्रगड व परिसरामध्ये डॉ. गोसावी आणि सहकार्यांच्या नजरेला ही वनस्पती पडली. त्यांनी त्याचा अभ्यास केला असता, या फुलवनस्पतीचा शोध लागला. ही वनस्पती पश्चिम घाट आणि परिसरासह घाटमाथ्यावरील उतारावर वाढते.
या झाडाची उंची १ ते ४ फूट असून, तिला हिरवी पाने आणि गर्द पिवळ्या रंगाची फुले येतात. जगात सोनसरीच्या १४ प्रजाती आहेत. या संशोधनाला गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच. पी. टी. व आर. वाय. के. महाविद्यालय, नाशिकचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संजय आवटी यांचे सहकार्य मिळाले आहे.