शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
4
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
5
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
6
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
7
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
8
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
9
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
11
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
13
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
14
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
15
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
16
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
18
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
19
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

दुर्मीळ रुजवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 4:27 AM

सृष्टीमध्ये जन्म, अस्तित्व आणि मृत्यू या तीनच शाश्वत गोष्टी असाव्यात कदाचित. प्राचीन भारतीय मान्यतेनुसार जन्मदाता, पालनकर्ता आणि संहारकर्ता अशा ...

सृष्टीमध्ये जन्म, अस्तित्व आणि मृत्यू या तीनच शाश्वत गोष्टी असाव्यात कदाचित. प्राचीन भारतीय मान्यतेनुसार जन्मदाता, पालनकर्ता आणि संहारकर्ता अशा तीन शक्ती सृष्टीचे संचलन करतात. त्यात काहीच अतार्किक नाही. आपल्या नजरेसमोर हा खेळ सतत चाललेला असतो. यातल्या जन्म आणि मृत्यू या क्षणिक तर अस्तित्व ही त्या तुलनेत अधिक काळ चालणारी प्रक्रिया आहे. जन्म सुखकारक तर मृत्यू दुःखद हे स्वाभाविक आहे. अस्तित्वात सुख आणि दुःख यांचा सतत पाठशिवणीचा खेळ चालू असतो. पण अस्तित्व हीच नव्या जन्माची कूस असते. त्यामुळे हे चक्र अविरत चालू राहण्यासाठी अस्तित्व किती आणि कसं आहे याला मोठं महत्त्व येतं.

काही दिवसांपूर्वी चांदफळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका खूप वैशिष्ट्यपूर्ण झाडाची एका देवराईत कत्तल झालेली पाहून व्यथित अंतःकरणाने त्याची गोष्ट मी लिहिली होती. आणि आज त्याच झाडाच्या बिया रुजण्याची आनंददायी गोष्ट मला सांगायची आहे. खरं तर कोणतीच झाडं तोडू नयेत या भाबड्या अंधविश्वासातून बाहेर पडल्याला खूप दिवस झाले. झाडं लावावी आणि त्यांच्या उपयोगासाठी ती तोडावीच असं सध्या माझं मत आहे. संन्यास घेतला तरच झाडं तोडण्यापासून पूर्णपणे अलिप्त राहता येईल एवढं खरं.

मात्र काही झाडं विशिष्ट असतात, अद्वितीय असतात. अनेक झाडे निसर्गतःच दुर्मिळ असतात. ती सहसा सर्वत्र आढळून येत नाहीत. त्याचप्रमाणे काही झाडं प्रदेशनिष्ठ असतात. अर्थात ती एखाद्या ठराविक प्रदेशातच आढळतात. अशा झाडांचं दर्शन दुर्मीळ असतं. जगात सर्वात अजस्त्र वाढणारी म्हणून प्रसिद्ध असलेली महाकाय रेडवूड झाडं केवळ उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यालगत असलेल्या सिएरा नेवाडा पर्वतराजीत आढळतात. त्यांना आपण कधी आणि कसं बघायचं? त्यातल्या एकेका झाडाच्या शेकडो वर्षांच्या अस्तित्वात त्याने काय काय अनुभवलं असावं बरं? कविकल्पना अशी आहे की अशा एखाद्या झाडाखाली बसून डोळे मिटले तर त्याचे श्वास तो सगळा अनुभव आपल्या श्वासात मिसळून देतील.

अशाच प्रकारची अनेक दुर्मीळ आणि प्रदेशनिष्ठ झाडं आपल्या सह्याद्री पर्वत रांगांमध्ये आढळतात. त्यापैकीच एक हे चांदफळ. याचं शास्त्रीय नाव आहे Antiaris toxicaria. याच्या खोडातून निघणाऱ्या चिकाला जहाल विषारीपणा असतो; त्यामुळे toxicaria. जंगलाच्या आच्छादनातून वर उंच डोकावणारी जी मोजकी झाडं असतात त्यात याचा समावेश होतो. याचा सरळसोट बुंधा सहज शंभर सव्वाशे फुटापर्यंत असतो. याच्या सानिध्यात बसल्यावर कुणा बुजुर्ग व्यक्तिमत्त्वाच्या सावलीत असल्याची भावना होते. कधी काळी ही झाडे बऱ्यापैकी संख्येत असावीत. पण आज अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच शिल्लक आहेत.

माझे जुने सहकारी अमित मिरगळ यांनी काही वर्षांपूर्वी या झाडाचा अभ्यास करून पीएच.डी केली. या झाडांची नैसर्गिक रुजवण होत नसल्याची माहिती त्यातून पुढे आली. असं होत राहिलं तर आत्ता जी झाडं आहेत ती आपल्या मरणाने मेली काय किंवा माणसांनी तोडली काय, एकच परिणाम होणार. हे झाड नामशेष होणार. आणि हे असं एकच झाड नाही: काळा धूप, पांढरा धूप, शिडम, मायफळ, वट अशी अनेक आहेत. या सगळ्या बुजुर्ग पण दुर्मीळ वृक्षांचं अस्तित्व कोणतीही निशाणी शिल्लक न ठेवता मिटून जाणार आहे.

वाघ नामशेष होऊ नये म्हणून दरवर्षी शेकडो कोटी रुपये खर्च करणाऱ्या आपल्या देशात वाघाइतक्याच संकटग्रस्त असलेल्या या झाडांची दखल सुद्धा घेतली जात नाही. पण काही भारावलेली माणसं अशा कामांना वाहून घेतात. माझा मित्र (एके काळचा विद्यार्थी) मिलिंद पाटील कुडाळमध्ये आपल्या परीने वृक्ष संवर्धनाचे काम करतोय. त्याच्या नर्सरीत त्याने अनेक दुर्मीळ वृक्षांची रोपे तयार करण्याचे मिशन हाती घेतलंय. त्यासाठी तो अक्षरशः वणवण भटकतो, लोकांना भेटतो, झाडं शोधून काढतो, त्यांच्या बिया गोळा करतो, त्या रुजवतो, संशोधकांशी चर्चा करतो. त्याच्या या एकंदर सर्व उपद्व्यापाला एक शास्त्रीय बैठक आहे. जंगलाचं अंतरंग समजून घेऊन त्यावर आधारित जंगल पुनर्स्थापनेचे प्रयोग करण्याचं तो योजतो आहे. सह्याद्रीच्या जंगलाची राखण करणाऱ्या या वृक्षरुपी एकांड्या शिलेदारांना रसद पुरविण्याचा त्याचा प्रयत्न आहे. पण त्याला जाणीव आहे की हे काम एकट्याने करण्याचं नाही.

मग त्याने ठरवलं की वनविभागाला आपल्या कामाशी जोडून घ्यायचं. कुडाळचे नवीन वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यांच्याशी चर्चा करून आणि त्यांच्या वरिष्ठांच्या मान्यतेने त्याने एक कार्यक्रम आखला. यात त्याने सर्व वनरक्षकांना सामील करून घेतलं, त्यांना एक प्रेझेंटेशन दिलं. त्यात सिंधुदुर्गात आढळणाऱ्या दुर्मीळ झाडांची ओळख कशी पटवायची, त्यांची ठिकाणं कशी शोधायची, त्यांचं बी कधी गोळा करायचं ते सगळं दाखवलं. त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चेचा धागा पुढे नेण्यासाठी एक समाज माध्यमाचा ग्रुप बनवला. आणि मग सुरू झाली प्रत्यक्ष मोहीम.

अनेक वनरक्षकांनी आपली इतर कामे सांभाळून या कामात देखील रस घेतला. आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू लागलं. दुर्मीळ झाडांची ठिकाणं मिळू लागली. आणि एके दिवशी जयदत्त आरगडे या वनरक्षकाला अक्षरशः घबाड मिळालं. एक उंच अवाढव्य झाड आणि त्याखाली पडलेला फळांचा सडा. त्यांनी फोटो पाठवले, ओळख पटवली आणि बी गोळा केलं. ते होतं आपलं चांदफळ. आज वनविभागाच्या चाफेली नर्सरीमध्ये चांदफळाच्या एक हजार बिया रुजताहेत. ही रोपं मोठी झाली की त्यातली किती कुठे - जंगलात, देवराईत, बागेत, शेतात - लावायची याचं देखील त्यांनी नियोजन केलं आहे.

काही वर्षांनी चांदफळाची अनेक झाडं जोमाने जंगलाचं छत भेदून आकाशाच्या काळजात शिरतील. या झाडाचं जन्म मृत्यूचं चक्र आता पुन्हा फिरायला लागेल. आणि त्या देवराईत तुकडे होऊन पडलेल्या वृक्षाचं दुःख हलकं होईल. आता गरज आहे ती ही मोहीम इतर ठिकाणी राबवण्याची. माणसांचं जग निसर्गावर उलटलेलं असताना जन्मदाता आणि पालनकर्ता या दैवी भूमिका वठवणारे मिलिंद, जयदत्त, अमित आणि अमृत मला तरी सिंधुदुर्गातील दशावतारी कलाकारच वाटतात. त्यांना माझे नमन.

~विनायक पाटील, दापाेली