देवरूख : कोकण हे जैवविविधतेने नटलेले आहे. येथील जैवविविधतेची नोंद करण्यासाठी फिरत असताना संगमेश्वर तालुक्यातील महिमान गडाच्या जंगलात देवरूखमधील प्रतीक मोरे व त्याचा मित्र शार्दुल केळकर या दोन निसर्गप्रेमी तरूणांना दुर्मीळ प्रजातीचे तमिळ येवमन हे फुलपाखरू दिसून आले. त्यामुळे तामिळनाडू राज्यातील या दुर्मीळ फुलपाखराची नोंद संगमेश्वर तालुक्यात प्रथमच करण्यात आली आहे.कोकणातील जैवविविधतेची नोंद करण्याचा छंद प्रतीक मोरे याला आहे. प्रतीक मोरे आणि त्याचा मित्र शार्दुल केळकर हे दोघेजण संगमेश्वर तालुक्यातील कुंडी गावनजीक असणाऱ्या महिमान गडाच्या जंगलात सफर करत असताना सह्याद्री पर्वतरांगांमध्ये तमिळ येवमन या दुर्मीळ जातीच्या फुलपाखराचे दर्शन झाले.
ज्या फुलपाखराच्या शोधात प्रतीकने अगदी गोव्यापर्यंत प्रवास केला तेच फुलपाखरू आता कोकणातील सह्याद्रीच्या खोऱ्यात प्रतीकला आढळून आले. या फुलपाखराच्या दर्शनाने इतक्या वर्षाच्या त्याच्या शोधाला यश आल्याचे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होते. त्याने या फुलपाखराची आपल्याजवळील कॅमेराच्या माध्यमातून छायाचित्रेही काढली.प्रतीकने गोवा राज्यातील बोंडला नॅशनल पार्कमध्ये जाऊन फुलपाखरांची ओळख करून घेतली आहे. त्यामुळे त्याला हे फुलपाखरू पाहिल्यानंतर ते तमिळ येवमन असल्याचे लक्षात आले. या फुलपाखराचा रंग डार्र्क ब्राऊन असून, हे फुलपाखरू झाडाच्या पानावर बसलेले होते. सकाळच्या कोवळ्या उन्हात या फुलपाखराचा रंग हिरव्यागार पानातून खुलून दिसत होता.एंडेमिक जातीत समावेशआपल्या देशात ज्या राज्यांनी राज्य फुलपाखरे घोषित के ली आहेत. त्या राज्यांपैकी तामिळनाडू हे तमिळ येवमन हे दुर्मीळ फुलपाखरू आहे. या फुलपाखराला तमिळ संस्कृतीमध्ये एक अनन्यसाधारण असे महत्व आहे. या फुलपाखराला मर्वन म्हणजेच तामिळी योद्धा असेही म्हटले जाते. देशभरात केवळ पश्चिम घाटामध्येच मिळणाऱ्या ३२ एंडेमिक जातींमध्ये या फुलपाखराचा समावेश होतो. यामुळेच हे ह्यतमिळ येवमनह्ण फुलपाखरू किती दुर्मीळ आहे याची प्रचिती येते.
तमिळ येवमन हे दुर्मीळ फुलपाखरू सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली व रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळेपर्यंत आढळून आल्याची नोंद आहे. मात्र, हे फुलपाखरू खासकरून संगमेश्वर तालुक्यातही आढळून आल्याने आपल्याला आनंद झाला आहे. हे दुर्मीळ जातीचे फुलपाखरू सह्याद्रीच्या खोऱ्यात आढळल्याने येथील जैवविविधता अजूनही समृद्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.- प्रतीक मोरे, देवरूख.