सवेणीत २३ पॉझिटिव्ह
खेड : तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कोरोनाची चेन तोडण्यासाठी गावपातळीवर वैद्यकीय विभागाकडून तपासणी यंत्रणा कार्यरत केलेली आहे. त्याप्रमाणे सवेणी - बौद्धवाडीत तपासणी केल्यानंतर २३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वांचे धाबे दणाणले आहेत.
शिवसेनेने प्रवासी शेड उभारली
खेड : तालुक्यातील कळंबणी येथे शिवसेनेने प्रवासी शेड उभारुन येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्याचे काम केले आहे. उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी स्त्री - पुरुष रुग्ण संपूर्ण तालुक्यातून येत असतात. या ग्रामस्थांना सावली मिळावी, या हेतूने शिवसेनेतर्फे ही प्रवासी शेड उभारण्यात आली आहे.
पावणे दोन लाखांचा दंड वसूल
खेड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. फिरताना मास्क वापरणे बंधनकारक असतानाही त्याकडे कानाडोळा करत आतापर्यंत विनामास्क फिरणारे ४२१ जण कारवाईच्या कचाट्यात अडकले. त्यांच्याकडून आतापर्यंत १ लाख ७८ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहे.
खेडमध्ये ६ गावांना टँकरने पाणीपुरवठा
खेड : तालुक्यातील कशेडी बंगला येथे पाण्याचे भीषण दुर्भीक्ष्य निर्माण झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर बुधवारपासून या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे तहानलेल्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यात ६ गावे ८ वाड्यांना एका शासकीय टँकरद्वारे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
असगणीत भूमिपूजन
खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार सरचिटणीस संदीप फडकले यांच्या माध्यमातून असगणी येथील महादेव मंदिराच्या प्रवेशद्धाराशी कमान कामाचे भूमिपूजन पार पडले. या कामासाठी अशोक बुरटे, राजेंद्र धाडवे, सुभाष नायनाक यांचे सहकार्य लाभले आहे. यावेळी सरपंच अनंत नायनाक, माजी उपसरपंच श्रीकांत फडकले, गंगाराम इप्ते, आदी उपस्थित होते.
कोरेगाव आरोग्य केंद्रांतर्गत १०१५ जणांना लसीकरण
खेड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून, कोरेगाव प्राथमिक केंद्रांतर्गत आतापर्यंत १०१५ जणांनी पहिला व दुसरा डोस घेतल्याची माहिती देण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक महाडिक, आरोग्यसेवक शंकर पार्टे व आरोग्यसेविका, आदी लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवत आहेत.