मंदार गोयथळे/असगाेली : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने राज्य सरकारने शाळा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत; मात्र काेराेनामुळे तब्बल दोन वर्षे बंद असलेल्या शाळांचा आतील भाग व बाहेरील परिसर उंदीर, साप, विंचू, मोकाट जनावरे यांचे माहेरघर बनले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी धोकादायक बनल्या आहेत.
कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत त्यामुळे विद्यार्थी घरीच आहेत. ग्रामीण भागातील बंद शाळांच्या कुलपांवर गंज चढला आहे. खासगी शाळा बंद असल्या तरी त्या शाळांतील स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून सुरूच आहे, परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेत सफाई कामगार नसल्याने बंद असलेल्या शाळांची दयनीय अवस्था झाली आहे. वर्गखोल्यांमध्ये आता धुळीचे साम्राज्य पसरले असून, बंद शाळांमध्ये उंदरांनी आपले घर केले आहे. त्या उंदरांना आपले भक्ष्य बनविण्यासाठी सापांनीही शाळेतच ठाण मांडल्याचे काहीवेळा पाहायला मिळत आहे.
तसेच शाळेच्या परिसरात कंबरे एवढे गवत वाढल्याने त्यातून जायचे कसे, हा प्रश्नच आहे. ज्या शाळेला आवार, भिंत नाही किंवा आवार, भिंत असूनही प्रवेशद्वार नाही अशा शाळेच्या आवारात त्या गावातील जनावरे येऊन थांबत आहेत. त्यातच वर्गावर्गांमध्ये बेंचवर मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे. शाळाच बंद असल्याने त्या शाळा स्वच्छ करण्याचा मानस कुणी ठेवला नाही. धूळ आणि वर्गात पसरलेले जाळे अशी या शाळांतील विदारक परिस्थिती असून, शाळा सुरू करण्यापूर्वी शाळांची स्वच्छता करण्याची मागणी हाेत आहे.