चिपळूण : देशात प्रथमच होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून एकमेव ईशा केतन पवारची निवड झाली असून, धनुर्विद्या खेळात शालेय पदकाचा करिश्मा घडवून तिने कोकणच्या क्रीडाक्षेत्रात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. डेरवणच्या एसव्हीजेसीटी अॅकॅडमी येथे ६ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत होणा-या खेलो इंडिया स्पर्धेसाठी ईशा सराव करत आहे. महाराष्ट्रातून खेलो इंडियाच्या धुनर्विद्या स्पर्धेसाठी १५ खेळाडूंची निवड झाली असून, रत्नागिरीतून ईशा एकमेव पात्र ठरली आहे.
या स्पर्धेसाठी पुण्याचे ६, बुलडाण्याचे ३, अहमदनगरचे २, अमरावतीचे २, तर मुंबईच्या एका खेळाडूची निवड झाली आहे. जबलपूर येथे झालेल्या १७ वर्षांखालील राष्ट्रीय शालेय स्पर्धेत पदक जिंकल्याने ईशा आता पहिल्या वहिल्या खेलो इंडिया स्पर्धेत अचूक वेध घेण्यासाठी सज्ज झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून निवड झालेल्या ईशाने खेलो इंडियामध्ये अचूक वेध घेऊन जिल्ह्याचे नाव रोशन करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी ती तयारी करत आहे. धनुर्विद्याचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रणजित चामले, ओेंकार घाडगे यांच्या मार्गदर्शनामुळेच ईशाने धनुर्विद्या खेळातील कम्पाऊंड प्रकारात मोठी मजल मारली आहे. गेली अनेक वर्षे कम्पाऊंड धनुष्य हा प्रकार शालेय स्पर्धेत समाविष्ट नव्हता. प्रथमच कम्पाऊंड प्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. विजेत्याला पुढील ५ वर्षांसाठी ५ लाख रुपये दरवर्षी शासनातर्फे देण्यात येणार आहेत.
पुण्यात कसून सराव केल्यानंतर ईशाच्या चेहऱ्यावर विजेतेपदाचा आत्मविश्वास प्रगट होत आहे. ती म्हणाली की, रणजीत सर आणि ओंकार सर माझ्यासाठी खूप कष्ट घेत आहेत. त्यांच्या कष्टाचे मी चीज करेन. स्पर्धेत पदक जिंकून डेरवण, रत्नागिरी आणि महाराष्ट्राचाही झेंडा फडवेन, असा विश्वास तिने व्यक्त केला.
‘सुवर्णकन्ये’च्या नावावर ६० पदके
राज्य स्पर्धेत गेली तीन वर्षे सुवर्ण पदकाची हॅटट्रिक करणाऱ्या ईशाने राष्ट्रीयस्तरावर आपल्या यशाची पताका फडकवत ठेवल्या आहेत. ४० राज्य व २० राष्ट्रीय अशी ६० पदके तिच्या नावापुढे झळकत असून, कोकणची सुवर्णकन्या असा तिने लौकिक प्राप्त केला आहे. यंदाच्या हंगामात रत्नागिरीतून ४०पेक्षा अधिक क्रीडा प्रकारात शालेय स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व खेळात ईशा ही एकमेव खेळाडू रत्नागिरीतून खेलो इंडियाच्या मैदानात चमकताना दिसणार आहे.