रत्नागिरी : धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने व सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळा समितीतर्फे येत्या १२ मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येथील पटवर्धन प्रशालेच्या आवारात दुपारी १२.३५ मिनिटांनी हा सोहळा होणार आहे. यावेळी कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील ११ मुलींचे विवाह यावेळी होणार आहेत.धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या धार्मिक व धर्मादाय स्वरूपाच्या न्यासाकडे शिल्लक निधीतील काही निधीचा वापर समाजकल्याण, सामजिक उपक्रमाकरिता करता येतो. त्यातूनच सर्व धर्मियांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांच्या २५ प्रतिनिधींची नोंदणीकृत सामुदायिक विवाह सोहळा समिती तयार झाली आहे.
या सामुदायिक विवाहाची जबाबदारी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे आणि सहाय्यक धर्मादाय आयुक्त ए. पी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक विवाह सोहळा समिती उचलणार आहे. यासाठी आवश्यक असणारे मणी मंगळसूत्र, संसारोपयोगी भांडी, पोशाख, भोजन व्यवस्था विविध संस्था तसेच व्यक्ती करणार आहेत. वधू - वरांना घरापासून विवाहस्थळापर्यंत आणण्यासाठीचा प्रवास खर्च समिती उचलणार आहे.सामाजाची गरज म्हणून असे सामुदायिक विवाह होणे गरजेचे असल्याने धर्मादाय आयुक्त कार्यालयाने उत्तम पाऊल उचलले आहे. या सोहळ्याला धर्मादाय कार्यालयाच्या सहआयुक्त निवेदिता पवार तसेच इतर शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त अमोल कुलकर्णी तसेच सामुदायिक विवाह समितीतर्फे करण्यात आले आहे.वारेमाप खर्च...लग्नसोहळा सध्याच्या काळात प्रतिष्ठेचा समजला जात असल्याने वधू आणि परपक्षांकडून या सोहळ्यासाठी वारेमाप खर्च केला जातो. मुलीच्या वडिलांची ऐपत नसल्याने प्रसंगी घर, जमीन गहाण ठेवून मुलीचे लग्न करून देतात. या घटना थांबाव्यात, यासाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे.