मेहरून नाकाडेरत्नागिरी : सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार ग्रामीण योजनेंतर्गत जिल्ह्यात शेताच्या बांधावर वृक्ष लागवड करण्याचा निर्धार शासनाने केला आहे. या योजनेंतर्गत जॉबकार्डधारक शेतकऱ्यांच्याच बांधावर वृक्ष लागवड केली जाणार असून, प्रत्येक तालुक्यासाठी २२ हजार ३०० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यामुळे नऊ तालुक्यांतर्गत एकूण दोन लाख ७०० वृक्ष लागवड शेताच्या बांधावर होणार आहे.एमजी नरेगा योजनेंतर्गत जॉबकार्डधारक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, कर्ता पुरूष नसलेली कुटुंब, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास, वननिवासी लाभार्थी यांना प्राधान्य दिल्यानंतर कृषी कर्जमाफी व कर्जसहाय्य योजनेतील लहान व सीमांत भूधारक शेतकऱ्यांच्या जमिनींवरही हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमासाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत. यामध्ये लाभार्थ्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. तसेच पाच एकरपेक्षा कमी क्षेत्र अपेक्षित आहे.इच्छुकांनी या योजनेसाठी आपले अर्ज ग्रामपंचायतीकडे दाखल करायचे आहेत. त्यानंतर तो अर्ज ग्रामपंचायतीने आपल्या शिफारशींसह सामाजिक वनीकरणाच्या संबंधित शाखेत हस्तांतरित करायचा आहे.
यानंतर वनपाल प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मंजुरीसह प्रस्ताव सामाजिक वनीकरणाकडे सादर करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रस्ताव करून सामाजिक वनीकरण विभागातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
पावसाळ्यात या योजनेंतर्गत बांधावर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. एमजी नरेगांतर्गत जॉब कार्डधारक शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षलागवड कार्यक्रम सामाजिक वनीकरण विभागाने हाती घेतला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावर संपर्क साधण्यात आला असून, शेतकऱ्यांकडून याबाबत विचारणा होत आहे.
राजापूर, खेड, लांजा तालुक्यातून शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. साग, बांबू लागवडीला शेतकऱ्यांची पसंती होत आहे. याशिवाय चंदन व काजू लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी तयारी दर्शविली आहे. राजापूर तालुक्यातील पाचल, हातदे, कारवली, सौंदळ, तळवडे येथे एकूण १९ हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड केली जाणार आहे. पाचल येथील १३ शेतकरी बांबू लागवडीसाठी तयार झाले आहेत.
ग्रामपंचायतीमार्फत वृक्ष लागवडीसाठी प्राधान्य देण्यात आले आहे. उत्तम व सुक्ष्म नियोजनाव्दारे गाव हिरवेगार, पर्यावरण समृध्द, स्वच्छ, सुंदर करण्याचा मानस आहे. त्यामुळे लागवडीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरंपचांना पत्र पाठविण्यात आले आहे.ग्रामपंचायतस्तरावर वृक्ष लागवडीबाबत सभा घेण्यात येणार असून, त्यांना या योजनेची माहिती देण्यात येत असून, ग्रामपंचायतीशी किंवा तालुका वनक्षेत्रपालाशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी पाठवलेले अर्ज ग्रामपंचायतीकडून सामाजिक वनीकरण विभागाकडे व तेथून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले जाणार आहेत.
बांधावरील वृक्ष लागवडीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्यांना पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांचा ओढा बांबू, साग, काजू, चंदनासाठी आहे. चिखलगाव येथील शेतऱ्यांनी साग लागवड करण्याचे ठरविले आहे.
बांबू, सागाची रोपे रोपवाटिकेत, तर काजूची रोपे कृषी विभागाच्या रोपवाटिकेत उपलब्ध आहेत. प्रतिकूल परिस्थितही बांबू, साग लागवड चांगली असल्यामुळे सर्वाधिक मागणी आहे. शेतकऱ्यांना खात्यात रोपांची रक्कम मागणीप्रमाणे जमा केली जाणार आहे. पावसाळ्यात दोन लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले जाणार आहे.
- सी. एल. धुमाळ,
विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण रत्नागिरी.