शोभना कांबळेरत्नागिरी : कोकणची भूमी सुजलाम् सुफलाम् असली तरी काहीवेळा भौगोलिक परिस्थिती आणि वातावरण प्रतिकूल असले की मग परिस्थितीपुढे हात टेकून स्वस्थ बसावे लागते. मात्र, काहीजण स्वस्थ न बसता, त्यावरही मात करून यशस्वी होतात. कुर्धे (ता. रत्नागिरी) येथील हरिश्चंद्र बेहेरे आणि प्रसाद बेहेरे या पिता-पुत्रांनी अशीच प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत १६ वर्षांपूर्वी २२ एकर कातळावर फुलशेतीसह नारळ, काजू आणि आंब्याची लागवड करून नंदनवन फुलवले आहे.पावस - पूर्णगड मार्गावर असणाऱ्या कुर्धे गावाचा संपूर्ण भाग कातळाने व्यापलेला आहे. यावरच हरिश्चंद्र बेहेरे आणि प्रसाद बेहेरे या पिता-पुत्रांनी चक्क अडचणींवरच मात करीत कातळावर खड्डे न मारता, माती टाकून सुमारे १६ वर्षांपूर्वी १०० नारळांची लागवड केली. त्याचबरोबर आंबा, काजूचीही लागवड केली.
एवढ्यावरच न थांबता त्यांनी टायरमधील शेतीचा अभिनव प्रयोगही या कातळावर राबविला आहे. स्कूटर, रिक्षा, बस, ट्रक, ट्रक्टर आदी सर्व प्रकारच्या वाहनांच्या गुळगुळीत झालेल्या आणि फेकून देण्यात येणाऱ्या निरूपयोगी टायरचा वापर करूनच त्यांनी टाकाऊतून टिकाऊ तंत्र समोर आणले आहे.
या टायरमध्ये माती टाकून त्यात पडवळ, भेंंडी, कोहळा, दुधी भोपळा, लाल माठ, मुळा, मिरची आदी सर्व प्रकारच्या फळभाजीची यशस्वी लागवड केली आहे. हे टायर कित्येक वर्षे तसेच राहत असल्याने ही शेती त्यांना किफायशीर ठरली आहे. केवळ गांडूळ खतासारख्या सेंद्रीय खतावरच त्यांनी फळभाजीची लागवड यशस्वी करून दाखवली आहे.
यापैकी बहुसंख्य वेलवर्गीय भाज्या असल्याने त्यांनी या सर्व टायरवर लोखंडी मांडव उभारले आहेत. त्यामुळे या वेलांवर फळभाज्या लगडू लागल्या की, शेजारीच दुसरी रोपे तयार होतात. त्यामुळे एक पीक घेतल्यानंतर काही कालावधीत दुसरे घेता येते. अशाप्रकारे त्यावर वर्षातून दोनदा पीक घेता येते. पाणी पुरवठ्याच्या समस्येवरही त्यांनी मात केली आहे. सूक्ष्म सिंचनासाठी एचडीपीई पाईप वापरला जात असल्याने कित्येक वर्षे त्यांना तो बदलावा लागलेला नाही.फुलांना वर्षभर असणारी मागणी लक्षात घेऊन बेहेरे यांनी याच टायरमध्ये लिलीच्या फुलांची यशस्वी लागवड केली आहे. या विस्तीर्ण माळरानावर टायरमधील फूलशेती आणि फळबाग लागवड ही येणाऱ्या - जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. आज बेहेरे यांच्या बागेत माड, चिकू, काजू, विविध फळभाज्या याचबरोबर आता लिलीच्या फुलांचीही लागवड होत आहे. तसेच काळीमिरी, रूई, कढीपत्ता, सोनचाफा आदी आंतरपीकेही घेतली जात आहेत.काळीमिरी लागवड७४ वर्षीय हरिश्चंद्र बेहेरे हे अजूनही मुलासोबत या सर्व बागेची देखभाल करतात. गतवर्षी काळीमिरीची लागवड त्यांनी केली. मात्र, त्यापासून मिळालेल्या अधिक उत्पन्नाने त्यांना दोन हजार रूपयांचा नफा मिळवून दिला. यावर्षी त्यांनी या बागेतील झाडांवर काळिमिरीचे २०० वेल सोडले आहेत.सेंद्रीय शेतीवर भरबेहेरे यांचा सेंद्रीय शेतीवर भर असल्याने त्यांच्या या सर्व मळ्यासाठी गांडूळखत वापरले जाते. आंब्यावर कल्टार मारणाऱ्या बागायतदारांबाबत ते तीव्र नाराजी व्यक्त करतात. आंब्यांना कृत्रिम खत देणे म्हणजे व्यक्तीला व्यसन लावल्यासारखे आहे, असे मत बेहेरे व्यक्त करतात.गिरीपुष्प अन् भातशेतीही...महत्त्वाचे म्हणजे बेहेरे यांनी या बागेत गिरीपुष्पाची लागवड केली आहे. उंदरांसाठी कर्दनकाळ असलेल्या या गिरीपुष्पाचा उपयोग हिरवळीचे खत म्हणूनही होतो. याशिवाय १२ गुंठे क्षेत्रावर त्यांनी भातशेतीही यशस्वी केली आहे.१०० माडांची लागवडबहेरे यांच्या कुर्धेतील बागेतील १०० माडांपासून शहाळी आणि नारळाचे भरघोस उत्पन्न मिळत आहे. फुले तसेच नारळ, शहाळी ही विक्रीसाठी रत्नागिरी तसेच इतर भागातही पाठवली जातात.सुकलेल्या रोपांचा खत म्हणूनही वापरबेहेरे यांच्या बागेतील सुकणारी रोपेही बाहेर न फेकता, ती झाडांच्या मुळातच टाकली जातात. त्यापासून या झाडांना खत मिळते. या बागेतील कुठलीच गोष्ट टाकाऊ नाही. माडांच्या झावळा, सोडणी यांना उन्हाळ्यात चांगले वाळवून झाल्यावर त्यांचीही पावडर बनविणारे यंत्र बेहेरे पितापुत्रान आणले आहे. त्यापासून होणाऱ्या पावडरचा खतासारखा उपयोग करून झाडांच्या बुंध्यात ती टाकली जाणार असल्याची माहिती हरिश्चंद्र बेहेरे यांनी दिली.