लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : वाहतूक नियम तोडला म्हणून केवळ दंड भरून सुटका होते असे नाही तर अनेक वेळा वाहन चालवण्याचा परवाना रद्दही केला जातो. वाहतुकीमध्ये नियमितपणा असावा आणि त्यातून कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक शाखा अधिक काटेकोरपणे कार्यरत आहे. म्हणूनच चालू वर्षी नऊ महिन्यात ४९४ म्हणजेच दर महिन्याला सुमारे ५० जणांचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्यात आला आहेत. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, दारू पिऊन वाहन चालविणे अशांचे लायसन्स तीन महिन्यांसाठी परवाना रद्द केला जातो.
वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल अनेकवेळा दंड भरून घेतला जातो. परंतु विशिष्ट ६ नियमांचे पालन न करता गाडी चालवली तर वाहनचालकांचा परवाना रद्द केला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात २०१९ साली ६१०, २०२० साली ३७६ व २०२१(ऑगस्ट) ४९४ जणांचे परवाने रद्द झाले आहेत. गाडीच्या वेग मर्यादेवर, अवैध वाहतूक प्रवासी, माल वाहतूक मधून प्रवासी वाहतूक या सर्व गोष्टींवर वाहतूक शाखेची व परिवहन विभागाची बारीक नजर असते. घालून दिलेल्या नियमांचे पालन नाही केले कारवाई केली जाते.
अशी होते कारवाई...
ज्या वाहनचालकांवर कारवाई केली जाते अशा वाहनचालकांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव तयार केला जातो. हा प्रस्ताव परिवहन कार्यालयात पाठविला जातो. परिवहन विभागाकडून या वाहनचालकाचे समुुपदेशपही केले जाते. वाहतूक शाखेकडून तीन महिन्यांसाठी परवाना रद्द केला जातो. कायमस्वरूपी लायसन्स रद्द करण्याचा अधिकार हा परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचा आहे. व्यक्ती सातत्याने एक चूक सारखी करते आहे का, हेही तपासले जाते.
हे नियम माेडल्यास परवान्याचे निलंबन
- वाहन चालविताना सिग्नल तोडला तर कारवाई नक्की होते.
- दारू पिऊन वाहन चालविणे, मोबाईलवर बोलून गाडी चालविणे.
- अतिगतीने गाडी चालविणे, माल वाहतूक गाडीत प्रवासी वाहतूक करणे व अवैध प्रवासी वाहतूक करणे हे सर्व नियम तर वाहन चालविताना तोडले तर वाहनचालकाचे लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द केले जाते. या सर्व गोष्टींवर वाहतूक शाखेची बारीक नजर असते.
तीन महिने रद्द
वाहनचालक जर गाडी चालवताना मोबाइईलचा वापर करताना आढळला तर त्याचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द केला जातो. काही व्यक्ती सातत्याने जर गुन्हा करत असतील तर अशांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविला जातो. गाडी चालवतानाचे ६ नियम आहेत ते पाळले नाही तर अशांचे लायसन्स वाहतूक शाखेकडून तीन महिन्यांसाठी रद्द केले जाते.
नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे
गाडी चालविताना घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करूनच गाडी चालवावी. तसेच जर कोणी व्यक्ती नियमांचे उल्लघंन करत असेल अशांचा परवाना तीन महिन्यासाठी रद्द केला जातो. प्रत्येक महिन्याच्या शेवटी महिन्याभरात केलेेल्या केसेसचा प्रस्ताव परिवहन विभागाकडे पाठवला जातो. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे.
- शिरीष सासने, वाहतूक पोलीस निरीक्षक