दापोली (रत्नागिरी) : पोलादपूर महाबळेश्वरच्या प्रवास दरम्यान येणारा आंबेनळी घाटात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात दरीत कोसळलेली दुर्घटनाग्रस्त बस येत्या 6 आक्टोंबर रोजी बाहेर काढण्यात येणार आहे. ही बस बाहेर काढल्यानंतर आता पुढील तपासाला दिशा मिळणची शक्यता आहे.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या एकुण 30 कर्मचा-यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला होता. महाराष्ट्रच नव्हे तर देश या घटनेने हादरला होता. मात्र हा अपघात नेमका कशामुळे घडला याचे अद्याप कारण समजु शकलेले नाही. या अपघातग्रस्त बसची तपासणी केल्यावर कदाचित अपघाताचे तांत्रिक कारण समजण्याची शक्यता आहे. यावेळी तांत्रिक कारण समजण्याबरोबरच स्टेअरिंगवरील हाताचे ठसे मिळतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.एम एच 08 ई 9087 या क्रमांकाची ही 30 आसनी बस होती. या बस मधील ३१ कर्मचारी हे राहुरीला महाबळेश्वर मार्गे चालले होते. हि गाडी रोहा येथुन या प्रवासासाठी मागविण्यात आली होती. 28 जुलै रोजी सकाळी 6.55 वाजता मध्यवर्ती कार्यशाळेच्या आवारातुन सुटली होती. त्यानंतर पोलादपूर महाबळेश्वर येथील आंबेनळी घाटात 11 ते 11.30 च्या दरम्यान हा दुर्देवी अपघात घडला होता. या अपघातात बस सुमारे तब्बल १२०० फूट दरीत कोसळली होती.या अपघातात एकमेव प्रकाश सावंत झ्र देसाई हा कर्मचारी बचावला आहे. सावंत झ्र देसाई यांनी विद्यापीठाच्या चौकशी समितीपुढे दिलेल्या जबाबानुसार बसमधील वाहनचालक दोन वेळा बदली करण्यात आले. बस चांगल्या स्थितीत होती. सदर अपघातावेळी प्रशांत भांबिड हे मुख्य वाहन चालक हे बस चालवत होते. गाडी प्रवासा दरम्यान मातीच्या ढिगा-यावरून डावीकडुन खाली घसरून हा अपघात झाल्याचे सावंत देसाई यांनी चौकशी समितीसमोर सांगितले आहे.
असे असले तरी बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांच्यावर दापोलीचे आमदार संजय कदम यांच्यासह हर्णे पाजपंढरी येथील मृतांचे नातेवाईक पी.एन.चोगले यांनी संशय व्यक्त करणारे निवेदन शासनाकडे दिले आहे. कोळी महासंघाकडुनही याबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
मात्र अद्याप प्रकाश सावंत देसाई यांच्याविरोधातील कोणताही पुरावा सुरक्षायंत्रणेला मिळालेला नाही. त्यामुळे आता बसच्या स्टेअरिंगवर हातांचे ठसे मिळाल्यास यावरूनचे नेमके अपघातप्रसंगी कोण गाडी चालवत होते याची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र असे ठसे आता तब्बल दोन महिन्यानंतर स्टेअरिंगवर मिळतात का याकडे अनेकांचे लक्ष लागुन राहिले आहे.