रत्नागिरी : ज्या दुकानांमध्ये धान्य वितरण व्यवस्थित केले जात नाही, तसेच पॉस मशीनचा वापर न करता धान्य वितरण केले जाते, अशा दुकानांची तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश शासनाच्या पुरवठा मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम जिल्हाभरात सुरू झाली असून, जिल्ह्यात तसे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिली.रास्तदराच्या धान्य दुकानातील वितरण व्यवस्थेत होणारा काळा बाजार रोखण्यासाठी राज्य शासनाने धान्य वितरणामध्येही पॉस मशीनचा वापर करण्याची सक्ती केली. त्यानुसार, पुरवठा विभागाने गेल्या वर्षीपासून या प्रक्रियेला सुरूवात करीत जिल्ह्यातील बहुतांश दुकानात पॉस मशीन बसविले आहे. सुरूवातीला रेशन दुकानदारांकडून विरोध दर्शविण्यात आला होता. परंतु कमिशन वाढवून दिल्यानंतर त्याला संमती दर्शविली. आत्तापर्यंत जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये पॉस मशीनचे वाटप करण्यात आले आहे.रत्नागिरी आणि सिंधुदुुर्ग जिल्हे डोंगराळ असल्यामुळे मध्यंतरी कनेक्टिव्हिटीची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे अशा ३०२ दुकानांमध्ये पूर्वीप्रमाणेच धान्य वितरण करण्यात येत होते. मात्र, शासनाकडून त्यानंतर आलेल्या सूचनेनुसार, ज्या भागात कनेक्टिव्हिटीची अडचण येणार आहे, त्या भागात आवश्यकतेनुसार स्थानिक स्तरावरील शासकीय कर्मचारी (पोलीसपाटील, तलाठी, ग्रामसेवक, मंडल अधिकारी आदी) यांची ह्यरूट नॉमिनीह्ण म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.ज्या ठिकाणी पॉस मशीनद्वारे धान्य वितरणमध्ये अडथळा निर्माण होईल, त्या ठिकाणी पावतीद्वारे धान्य वितरण करून त्यानंतर अधिकृतरित्या त्या ठिकाणी नियुक्त केलेल्या ह्यरूट नॉमिनीह्णमार्फत बायोमेट्रिक प्रणालीद्वारे धान्य वितरीत केले जात असल्याने दुर्गम भागातील पॉस मशीनमध्ये अडथळा निर्माण करणारी कनेक्टिव्हिटीची समस्या दूर झाली आहे.
काही दिवसांपूर्वी पुन्हा पुरवठा मंत्रालयाकडून जिल्ह्यातील धान्य दुकानांमधून पॉस उपकरणाद्वारेच धान्य वितरीत करावे, ज्या दुकानातून पॉसद्वारे वितरण होणार नाही, त्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व दुकानांची विशेष तपासणी मोहीम जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहे, अशी माहिती फड यांनी दिली.जिल्ह्यात शासनाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने रेशनदुकानांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यामाध्यमातून ही मोहीम सध्या सुरू करण्यात आली आहे.जिल्ह्यात एकूण धान्याची मागणी ६००० टन इतकी आहे. त्यापैकी पॉस मशीनच्या सहायाने आतापर्यंत ३६६७ टन धान्याचे वितरण गणपती सणापूूर्वी करण्यात आले आहे. उर्वरित वाटप थोड्याच दिवसांत पूर्ण होईल, असेही फड यांनी सांगितले.