रत्नागिरी : विसर्जनानंतर काही तासातच झाला किनारा स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 01:27 PM2018-09-19T13:27:37+5:302018-09-19T13:29:38+5:30
भारतीय पर्यावरणशास्त्र, तंत्रज्ञान संस्था, फिशरीज महाविद्यालयाचे विद्यार्थी, रोटरी क्लब व रत्नागिरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या समवेत पालिकेचे कर्मचारी निर्माल्य संकलन उपक्रमात सहभागी झाले होते. मांडवी व भाट्ये किनाऱ्यावर निर्माल्य संकलन करण्यात आले. गौरी - गणपती विसर्जन असल्यामुळे भाविकांनी टाकलेले तीन टन निर्माल्य संकलित करण्यात आले.
रत्नागिरी : भारतीय पर्यावरणशास्त्र, तंत्रज्ञान संस्था, फिशरीज महाविद्यालयाचे विद्यार्थी, रोटरी क्लब व रत्नागिरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या समवेत पालिकेचे कर्मचारी निर्माल्य संकलन उपक्रमात सहभागी झाले होते. मांडवी व भाट्ये किनाऱ्यावर निर्माल्य संकलन करण्यात आले. गौरी - गणपती विसर्जन असल्यामुळे भाविकांनी टाकलेले तीन टन निर्माल्य संकलित करण्यात आले.
पर्यावरणशास्त्र व तंत्रज्ञान संस्थेतर्फे दरवर्षी निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवण्यात येतो. गौरी गणपती विसर्जनाबरोबर पूजेसाठी वापरलेली फुले, दुर्वा, फुलांचे हार, सत्यनारायण पूजेसाठी वापरलेले केळंबे, उदबत्त्या, कापूर पाण्यात टाकण्यात येतात. हे निर्माल्य लाटेबरोबर किनाºयावर येते. त्यामुळे ते पायाखाली येण्याची शक्यता असते. त्याऐवजी सर्व निर्माल्य संकलन करून ते भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात पाठविण्यात आले आहे.
मांडवी येथून दोन ट्रक, तर भाट्ये येथून एक ट्रक निर्माल्य संकलित करण्यात आले. गौरी गणपती विसर्जनाच्या वेळी गणपतींची संख्या अधिक असते. अनंत चतुर्दशीच्या दिवशीही गणपती विसर्जन केले जात असल्यामुळे या दिवशी निर्माल्य संकलन केले जाणार असल्याची माहिती पर्यावरणशास्त्र व तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी दिली.
संस्थेतर्फे गेली १२ वर्षे निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. गोळा केलेले निर्माल्य प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये येथे पाठविण्यात येते. या केंद्रात निर्माल्यापासून खत तयार करण्यात येते. तयार केलेले खत रोपवाटिकेसाठी वापरण्यात येते.
निर्माल्य संकलनासाठी नगरपालिकेने स्वतंत्र कक्ष स्थापन केला होता. नगराध्यक्ष राहुल पंडित, तसेच नगरपालिकेचे कर्मचारी संकलन कार्यक्रमात सहभागी झाले होते. किनाऱ्यावर ठिकठिकाणी प्लास्टिक पिंपही ठेवण्यात आली होती. पर्यावरण शास्त्र व तंत्रज्ञान संस्थेसोबत अंधश्रध्दा निर्मूलन समिती, शिरगाव मत्स्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी सहभागी झाले होते. नागरिकांमध्ये जागृती होत असल्याने, बहुतांश नागरिक स्वत:हून निर्माल्य कार्यकर्त्यांच्या स्वाधीन करत होते.