दापोली : पोलादपूर-आंबेनळी (जि. रायगड) अपघात प्रकरणातील संशयित आरोपी प्रकाश सावंतदेसाई यांना वाचवण्यासाठी बसचा मृत चालक प्रशांत भांबिड यांच्यावर गुन्हा नोंद केला असल्याचा आरोप करत ३० मृत कर्मचाऱ्यांचे संतप्त कुटुंबिय दापोली कोकणात कृषी विद्यापीठावर धडकले.दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुभाष चव्हाण यांच्या दालनात बुधवारी मृतांचे नातेवाईक धडकले. कृषी विद्यापीठाच्या चौकशी समितीने शासनाला दिलेल्या अहवालामुळेच प्रशांतवर गुन्हा नोंदविला गेला आहे का? या प्रकरणात प्रकाश सावंतदेसाई दोषी असून त्यांच्यावर करवाई व्हावी, अशी मागणीसुद्धा करण्यात आली.सावंतदेसाई यांची सीआयडी चौकशी व नार्को टेस्ट करण्यात यावी, असे पत्र विद्यापीठाने यापूर्वीच दिले होते, परंतु याबद्दल कोणतीही हालचाल नाही. बस सावंतदेसाई चालवत असल्याचा आरोप करत पुन्हा एकदा अपघात प्रकरणात पोलिसांनी वाहनचालक प्रशांत भांबिड यांच्यावर नोंदविलेला गुन्हा हा कुटुंबियांना अमान्य आहे.
आपला मुलगा असं करुच शकत नाही. पोलिसांनी कोणाच्या तरी दबावापोटी गुन्हा नोंदविला आहे. प्रशांतवर गुन्हा नोंदवून आमच्या कुटुंबावर पोलिसांनी अन्याय केला आहे. पोलिसांनी तपास नि:पक्षपातीपणे केला नाही. ही फाइल बंद करण्यासाठीच प्रशांतवर गुन्हा नोंदवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.आधीपासूनच सावंतदेसाई यांच्यावर आपला संशय आहे. असे असताना पोलिसांनी तब्बल ५ महिन्यानी मृत चालकावर गुन्हा नोंदविल्याने याप्रकरणाने पुन्हा एकदा कलाटणी घेतली आहे. या प्रकरणातील गूढ अजून वाढले आहे.दि. २८ जुलै २०१८ मध्ये पोलादपूर-महाबळेश्वर राज्य मार्गावर कोकण कृषी विद्यापीठाच्या ज्या बसला अपघात झाला, त्या अपघातात ३० कर्मचारी जागीच ठार झाले होते. याप्रकरणी पाच महिन्यानंतर मृत बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबेनळी घाटातील बस अपघात हा अपघात नव्हे तर घातपात होता, असा संशय आहे. पोलिस तपास योग्य दिशेने झाला नाही. तपास योग्य दिशेने झाल्यास सत्य बाहेर येईल, असे या नातेवाईकांनी सांगितले.हे नातेवाईक बुधवारी दापोली कोकण कृषी विद्यापिठाचे कुलसचिव डॉ. सुभाष चव्हाण यांच्या केबिनमध्ये धडकले व त्यांच्याशी चर्चा केली. प्रकाश सावंत देसाई यांची सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही केली आहे.
ही मागणी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी मान्य केली आहे, परंतु पोलादपूर पोलिसांनी मृत वाहनचालक प्रशांत भांबिड यांच्यावर गुन्हा नोंदवून प्रशांतवर अन्याय केला आहे. आम्हा सगळ्यांना न्याय हवा आहे. याप्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.