रत्नागिरी : साळवी स्टॉप येथे प्रस्तावित असलेल्या ट्रक टर्मिनसवरून सोमवारच्या नगर परिषद सभेत पुन्हा गदारोळ झाला.
या प्रकल्पासाठी अनेक पळवाटा ठेवण्यात आल्याचा आरोप करीत निविदेला स्थगिती देण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षप्रतोद सुदेश मयेकर यांनी केली, तर ट्रक टर्मिनसचा बांधकाम आराखडा मंजूर होत नाही तोवर बांधकामाला स्थगिती असल्यासारखेच आहे. हा आराखडा सध्या तपासणीसाठी नगररचनाकारांकडे असल्याची माहिती नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी सभागृहाला दिली.सभा सुरू होताच अन्य काही विषयांवर चर्चा झाल्यानंतर ट्रक टर्मिनसचा विषय उपस्थित करण्यात आला. याबाबत सुदेश मयेकर यांनी आक्षेपांचे पत्र नगराध्यक्ष राहुल पंडित यांना दिले व त्याचे सभागृहात वाचन करण्याची मागणी केली. मात्र, ट्रक टर्मिनसबाबत कोणतीही चुकीची भूमिका घेतलेली नाही.
याबाबत मुख्याधिकारी माळी यांच्याकडे मयेकर यांनी विचारणा केली असता ट्रक टर्मिनसचा बांधकाम आराखडा मंजूर होत नाही तोपर्यंत बांधकामाला स्थगिती दिल्यासारखीच आहे, असे मुख्याधिकारी अरविंद माळी म्हणाले.कोणत्याही स्थितीत नियमाच्या बाहेर जाऊन ट्रक टर्मिनसबाबत कार्यवाही होणार नाही. टर्मिनसबाबतचे प्रेझेंटेशन सभागृहात केले जाईल. मात्र, या उत्तरानेही विरोधकांचे समाधान झाले नाही. ट्रक टर्मिनस नेमका नागपूर महामार्गाच्या दिशेने होणार की, शहराच्या मुख्य रस्त्याच्या दिशेने होणार याबाबत सभागृहाला माहिती दिली जात नाही.
या विषयाची चर्चा होऊन दोन महिने झाले तरी प्रेझेंटेशन का झाले नाही, असा सवाल सुदेश मयेकर यांनी केला. आराखडा नगररचनाकारांकडे असल्याने त्यात योग्य - अयोग्य काय हे निश्चित होईल, असे नगराध्यक्ष पंडित म्हणाले.सभागृहात रस्ते दुरुस्तीच्या विषयावरूनही शाब्दिक चकमकी झडल्या. शहरातील काही रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. त्याची यादी नगर परिषद अभियंत्यांनी वाचून दाखवली.
त्यावेळी काही रस्त्यांवर खड्डे आहेत, त्यांची दुरुस्ती आवश्यक आहे. काही रस्त्यांचा पृष्ठभाग खराब झाला असला तरी ते रस्ते चांगले आहेत व सध्या दुरुस्तीची आवश्यकता नाही, असे सांगण्यात आले. यावरून भाजप सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे उर्वरित रस्ते खराब आहेत की नाहीत, त्यांचे काम करावे की नाही, याची पाहणी त्या प्रभागाच्या सदस्यांसोबत अभियंत्यांनी करावी, असे निर्देश पंडित यांनी दिले.अग्निशमन सक्षम नाही...नगर परिषद अग्निशमन विभागाची क्षमता अपुरी आहे. हा विभाग पूर्णत: सक्षम बनविण्याची गरज आहे. या विभागाकडे तीन वाहने असतानाही पाईप अपुरे आहेत. परंतु या विभागाने कोणतीही मागणी अद्याप दिलेली नाही. या विभागाने आवश्यक सामग्रीची माहिती द्यावी, असे निर्देश नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी दिले.परवानगी रोखता येणार नाहीपाणीप्रश्न अत्यंत गंभीर वळणावर आहे. त्यामुळे नवीन संकुलांना पाणी देणे शक्य होणार नाही. त्यांची बांधकाम परवानगी रोखता येईल काय, असे नगराध्यक्षांनी विचारले. त्यावर मुख्याधिकारी म्हणाले की, ठाणे महापालिकेनेही या प्रश्नावरून परवानगी नाकारली होती. मात्र, न्यायालयाने उलटा निकाल दिला.