रत्नागिरी : पावसाळ्यातील भातशेतीसाठी शेतकऱ्यांनी भात बियाणांची खरेदी सुरू केली आहे. डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव संशोधन केंद्रातर्फे विकसित करण्यात आलेल्या अन्य विविध वाणांसह ‘रत्नागिरी -८’ या वाणाला शेतकऱ्यांकडून चांगली पसंती लाभत आहे.
शिरगाव येथील संशोधन केंद्रातर्फे विकसित करण्यात आलेली भाताची, भुईमूगाची बियाणी विक्रीसाठी ठेवली आहेत. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून भात बियाणांसाठी मागणी वाढत आहे. सध्या लाॅकडाऊन सुरू असले तरी शेतकऱ्यांना भात बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. या केंद्रातून संशोधित भात बियाण्याला दीडपट उतारा लाभत असल्याने शेतकऱ्यांकडून वाढती मागणी आहे.
परजिल्ह्यासह परराज्यातून बियाणांसाठी संशोधन केंद्राकडे मागणी होत आहे. अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या सुधारित जातीच्या वाणासाठी विशेष मागणी होत आहे. रत्नागिरी ६, ७, ८ सह कर्जत ६, ७, ८ या प्रकारची बियाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गतवर्षी संशोधन केंद्राने रत्नागिरी ८ या जातीचे १६० टन बियाणे तयार केले होते. महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, उत्तरप्रदेश या पाच राज्यांतून रत्नागिरी आठ या बियाणांला मागणी होत आहे. शिरगाव संशोधन केंद्राने २५ टन भात बियाणांचे विक्रमी उत्पादन केले आहे. १३५ दिवसांत रत्नागिरी आठ हे वाण तयार होत आहे.
कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेले रत्नागिरी ७ या लाल भाताच्या सुधारित वाणाला विशेष मागणी होत आहे. १२० ते १२५ दिवसांत हे वाण तयार हाेते. खोडातील लवचितकतेमुळे जमिनीवर पडून लोळण्याचा धोका नाही. शिवाय उत्पादकताही जास्त देणारे वाण आहे.
कोट
शिरगाव संशोधन केंद्रात सातत्याने नवनवीन संशोधन सुरू असते. रत्नागिरी ६ ते ८ या वाणांना जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रासह अन्य राज्यातून पसंती मिळाली आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वाण उपलब्ध करून देण्यात आले आहे.
- विजय दळवी, संशोधन अधिकारी, कृषी संशोधन केंद्र शिरगाव.