रत्नागिरी : गुहागर विधानसभा मतदारसंघातील चिपळूण तालुक्यातील मूर्तवडे-वारेली ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून वारेली गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी, अशी मागणी भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत औचित्याचा मुद्याद्वारे शासनाकडे केली.नागपूर अधिवेशनाच्या आज पाचव्या दिवशी औचित्याचे मुद्दे मांडण्याच्या काळात जाधव यांनी आपल्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील हा विषय मांडून त्यास वाचा फोडली. हा मुद्दा सादर करताना ते म्हणाले की, "वारेली हे गाव अत्यंत डोंगराळ भागात वसलेले असून तेथील ग्रामस्थांना ग्रामपंचायतीशी संबंधित कामांसाठी मूर्तवडे या गावात असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यासाठी 19 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.
पायवाटेने जावे लागल्यास मोठा डोंगर चढ-उतार करून ये-जा करावी लागते. यामुळे ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आणि पायपीट करावी लागल्याने खूप हाल होतात. ही समस्या लक्षात घेता आणि सद्यस्थितीतील लोकसंख्येचा विचार करता या ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून वारेली येथे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी."या ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून वारेलीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्यात यावी, अशी मागणी जाधव यांनी यापूर्वी अनेकदा ग्रामविकास मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. परंतु, त्याची दखल न घेतल्याने आज त्यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्याद्वारे आवाज उठवला. त्यामुळे आता या प्रक्रियेला चालना मिळून वारेलीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.