देवरूख : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर देवरूखातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला आहे.काही दिवसांपूर्वी खेड येथील जिजामाता उद्यानातील महापुरुषाच्या पुतळ्याची समाजकंटकांनी विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर चिपळूण शहरातील मुंबई- गोवा महामार्गावरील कळंबस्ते - बौध्दवाडी येथील जयभीम स्तंभाच्या तोडफोडीचा प्रकार घडला होता.
या दोन्ही घटनांमुळे भीमसैनिकांनी संताप व्यक्त करून रास्ता रोको आंदोलन केले होते. याची दखल घेऊन देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांनी खबरदारी म्हणून पोलीस ठाण्यासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचा निर्णय घेतला होता.
यासाठी त्यांनी पुतळा समितीला विश्वासात घेतले. यानंतर पुतळा समितीने सीसीटीव्ही बसवण्यास परवानगी दिल्यानंतर देवरूख पोलीस ठाण्यामार्फत नुकताच डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर सीसीटीव्ही बसवण्यात आला आहे. या कॅमेऱ्याची यंत्रणा पोलीस ठाण्यात असून, पुतळ्यासह परिसरावर सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे.