दापोली : बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकीबरोबरच आता कृषी पदवी अभ्यासक्रमासाठीही सीईटी घेण्याचा निर्णय झाला असून, या परीक्षेसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस झालेल्या या निर्णयाची माहिती इच्छुक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास आता मर्यादा येणार आहेत. त्यामुळे ही महाविद्यालये यंदा ओस पडण्याची शक्यता आहे.आजतागायत बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्रावर हा प्रवेश मिळत होता. त्यात स्थानिक शेतजमिनीचा कौटुंबीक सातबारा, बारावीपर्यंतच्या कृषी विषयाचे गुण वाढीव म्हणून ग्राह्य धरण्यात येत होते. यंदा मात्र या गुणांपेक्षा सर्वाधिक महत्त्व सीईटीच्या गुणांना देण्यात येणार आहे, किंबहुना ही परीक्षा उत्तीर्ण नसल्यास इच्छुक उमेदवारांना कृषी प्रवेशासाठी अपात्र ठरविण्यात येणार आहे.मुळात कृषी पदवी अभ्यासक्रमाला व्यावसायिक म्हणून दर्जा देण्याचा निर्णय गेल्या वर्षीच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने घेतला होता. त्यानंतर राज्यातील एमसीएईआर अर्थात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेनेही त्यावर तातडीने शिक्कामोर्तब केले होते. मात्र, इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे कृषी शिक्षणाचाही प्रवेश सीईटीद्वारे होईल, असे कोणतेच संकेत त्यावेळी देण्यात आले नव्हते. मात्र, दरम्यानच्या काळात राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि संबंधित पदाधिकाऱ्यांची बैठक एमसीएईआरने आयोजित केली.यावेळी कृषी विद्यापीठाच्या स्तरावर अशी सीईटी घेणे शक्य आहे का, याबाबत चाचपणी करण्यात आली. तेव्हा ही जबाबदारी वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेणाऱ्या राज्य सीईटी सेलकडे देणे योग्य ठरेल, असे मत व्यक्त करण्यात आले होते. विशेष म्हणजे या निर्णयाची प्रक्रिया गेले चार महिने एमसीएईआरमध्ये सुरू होती. मात्र, याची माहिती १७ जानेवारीला सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच कृषी विद्यापीठांना याची माहिती मिळाली आहे. या परीक्षेसाठी आॅनलाईन अर्ज करण्यास १८ जानेवारीपासून सुरूवातही झाली आहे.मुळात इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी इच्छुक उमेदवार आधीपासूनच तयारी करतात. या वेळापत्रकाची विद्यार्थ्यांकडून वाट पाहिली जाते. मात्र, कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी इच्छुक उमेदवारांनी सीईटीचा आतापर्यंत कधीच विचार केलेला नाही. त्यामुळे सीईटीनुसार होणाऱ्या या नव्या प्रवेश प्रकियेची माहिती ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांपर्यंत पोचेपर्यंत खूप विलंब होणार आहे.या सीईटीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च अशी असून, १० मे रोजी परीक्षा होणार आहे. कृषी अभ्यासक्रमासाठी सीईटी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे, ही माहिती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचे नवे आव्हान कृषी विद्यापीठ यंत्रणेवर आलेले आहे. त्यातून अनेक कृषी महाविद्यालयांतील विद्यार्थी संख्या अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.१५६ खासगी, ३५ शासकीयराज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात एकूण १५६ खासगी आणि ३५ शासकीय कृषी महाविद्यालये आहेत. यामध्ये १५ हजार २२७ जागांचा समावेश असून, गेल्या वर्षी ५५ हजार अर्ज आले होते. त्यावेळी ही प्रवेश प्रक्रिया बीएस्सीच्या धर्तीवर खुल्या स्वरूपाची होती. यंदा त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या प्रवेश प्रक्रियेच्या माहिती प्रसाराचे आव्हान कृषी विद्यापीठांसमोर असून, यंदा कृषी महाविद्यालये ओस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रत्नागिरी : सीईटी घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मर्यादा, कृषी महाविद्यालये ओस पडण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 3:57 PM
बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकीबरोबरच आता कृषी पदवी अभ्यासक्रमासाठीही सीईटी घेण्याचा निर्णय झाला असून, या परीक्षेसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस झालेल्या या निर्णयाची माहिती इच्छुक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास आता मर्यादा येणार आहेत. त्यामुळे ही महाविद्यालये यंदा ओस पडण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देकृषी महाविद्यालये यंदा ओस पडण्याची शक्यतासीईटी घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मर्यादा