चिपळूण : ऐन पाणीटंचाईच्या काळात तालुक्यातील ९ गावांना पाणीपुरवठा करण्याबाबतचे दाखले तहसील कार्यालयातून पंचायत समितीकडे पाठविण्यात आले असूनही केवळ टँकर नादुरुस्त असल्याच्या कारणावरुन ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात नसल्यामुळे संतप्त झालेले टेरवचे माजी उपसरपंच किशोर कदम यांनी पंचायत समिती आवारात अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांना बोलावल्यामुळे काहीकाळ पंचायत समितीत तणावपूर्ण शांतता निर्माण झाली.चिपळूण तालुक्यातील ९ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा यासाठी प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यामुळे संबंधित गावातील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी सातत्याने पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागात व प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. तरीही अद्याप या गावांमध्ये पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. टेरव येथील टँकरच्या मागणीसाठी माजी उपसरपंच कदम हे पंचायत समितीकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
गुुरुवारी ते पाणीपुरवठा विभागात गेले असता, त्यांना योग्य उत्तर मिळाले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कदम यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. त्यानंतर ते गटविकास अधिकाऱ्यांना भेटले. यावेळी त्यांच्याशीही ते चढ्या आवाजात बोलत होते.
त्यामुळे कदम यांचा उद्वेग पाहून गटविकास अधिकारी सरिता पवार यांनी चिपळूण पोलीस स्थानकात फोन करुन पोलिसांना बोलावले. यावेळी दोन पोलीस पंचायत समितीत आले. मात्र, त्यांच्यासमोरही किशोर कदम यांची आगपाखड सुरुच होती.ऐन दुपारी पाणी पुरवठ्यावरुन पंचायत समितीचे वातावरण चांगलेच तापले होते. उन्हाच्या झळांबरोबरच या वादाच्या झळाही पाहायला मिळत होत्या. नादुरुस्त टँकर व चालकांचा अभाव असल्यामुळे दाखले हातात असूनही पाणीपुरवठा केला जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गटविकास अधिकारी सरिता पवार यांच्या कारभाराबद्दलही यावेळी काहींनी नाराजी व्यक्त केली.