चिपळूण : खासगी आरामबस गाडी मालकाविरोधात चोरीची खोटी फिर्याद दाखल केल्याप्रकरणी खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयाने गुहागरचे तत्कालिन पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर, उपनिरीक्षक डी. आर. कदम यांच्यासह सातजणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश चिपळूणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे यांना दिले आहेत. या प्रकरणी कोणताही विलंब न लावता, तपास करावा, असेही निर्देश दिले आहेत.गुहागरचे तत्कालिन पोलीस निरीक्षक मिसर, उपनिरीक्षक कदम, रश्मी भगवान चव्हाण, अनंत जाधव, रिटा (नगरसेविका, विरार), संदीप श्रीकृष्ण गुरव, वाशिदभाई अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश खेड न्यायालयाने दिले आहेत.
याबाबत दशरथ विश्राम शिंदे (तनाळी, ता. चिपळूण) यांनी गुहागर न्यायालय व खेड सत्र न्यायालयात अॅड. संदीप पाटील यांच्यावतीने दावे दाखल केले होते. शिंदे यांनी उदरनिर्वाहासाठी खासगी आरामबस खरेदी केली होती. मात्र, यासाठी शिंदे यांनी आपली भाची रश्मी चव्हाण हिच्याकडून पैसे घेतले होते. चव्हाण यांनी शिंदे यांच्याकडे उसने घेतलेल्या पैशासाठी तगादा लावला होता. यामुळे शिंदे यांनी या रकमेपोटी तिच्याकडे ही गाडी तीन महिन्यांसाठी दिली.तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही ती गाडी परत करीत नव्हती. यामुळे शिंदे यांनी दुसऱ्या चावीच्या सहाय्याने गाडी रामपूर येथे आणली. यावेळी रश्मी चव्हाण यांनी चालकाच्या मदतीने शिंदे यांच्या विरोधात गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दशरथ यांच्यासह पाच जणांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक कदम यांनी शिंदे यांची परवानगी न घेता, ती गाडी गुहागर पोलीस ठाणे येथे नेऊन उभी केली. यानंतर शिंदे यांनी गुहागर न्यायालयात दावा दाखल केला. मात्र न्यायालयाने पुरावे सादर करण्यास सांगितले. यामुळे शिंदे यांनी खेड जिल्हा न्यायालयात रिव्हीजन अॅप्लिकेशन केले. त्याची सुनावणी होऊन न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी गुहागर न्यायालयाचा आदेश रद्द केला.