चिपळूण : चिपळूण तालुका हा विचारवंतांचा तालुका आहे. याठिकाणी लवकरच रेल्वेचा कारखाना होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करताना देशातील ९० टक्के लोकांनी माझे स्वागत केले. २५ वर्षात कोकण रेल्वेत जी कामे झाली नव्हती, ती कामे गेल्या काही महिन्यात आपण मार्गी लावली आहेत.
कोकणातील माणसाने आतापर्यंत आपल्यापेक्षा दुसऱ्याचा विचार केला आहे. कोकणच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊया, असे आवाहन केंद्रीय वाणिज्य व विमान वाहतूक व्यवस्थामंत्री सुरेश प्रभू यांनी केले.सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या भाऊसाहेब महाडिक सभागृहात शुक्रवारी लाभार्थीधारक महिलांना उज्ज्वल योजनेंंतर्गत एलपीजी गॅस आणि शेगडी वितरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी केंद्रीय मंत्री प्रभू बोलत होते. ग्रामीण भागातील महिलांना जेवण बनवताना अनेक दिव्यातून जावे लागते. त्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी उज्ज्वल योजनेद्वारे सर्वांना गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे.ते पुढे म्हणाले की, महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून संधी मिळवून देण्यासाठी आपण कटिबध्द राहूया. उज्ज्वल दिवस येण्यासाठी सर्वसामान्यांचे जीवन बदलले पाहिजे. सरकारबरोबर स्वयंसेवी संघटनांनीही काम केले पाहिजे. हा दिवस पंतप्रधानांनी नव्या युगाची सुरुवात म्हणून साजरा केला आहे.
शासनाच्या कोणत्याही योजनेत अडथळा आल्यास आपणाकडे संपर्क साधावा. त्यात कोणीही दोषी आढळल्यास त्यावर कडक कारवाई करु, असेही केंद्रीय मंत्री प्रभू म्हणाले.
या कार्यक्रमाला सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, उमा प्रभू, प्रमोद अधटराव, एलपीजीचे जनरल मॅनेजर पी. के. कोठारे, जिल्हा पुरवठा अधिकारी जयकुमार फड, उपविभागीय अधिकारी कल्पना जगताप-भोसले, तहसीलदार जीवन देसाई, सभापती पूजा निकम, डॉ. सुभाष देव, राजश्री विश्वासराव, गिरीष कोल्हटकर, अॅड. दीपक पटवर्धन, तहसीलदार व पुरवठा खात्यातील अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक पी. के. कोठारे यांनी केले. सूत्रसंचालन सलीम मोडक यांनी केले.राजकारण माध्यमदेशाच्या विकासासाठी झगडायचे आहे. सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी मी उभा आहे. त्यांच्या विकासासाठी राजकारण हे एक माध्यम आहे. केवळ राजकारणी म्हणून घेणाऱ्यांपैकी मी नाही. मागच्यावेळी मी लोकसभेसाठी उभा राहिलो नाही. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितल्यानुसार मी एका खात्याची जबाबदारी स्वीकारली.