रत्नागिरी : शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठीचा आहे. रत्नागिरीमध्ये शिवसेनेच्या मागून फरपटत जाण्यापेक्षा स्वतंत्रपणे उमेदवार उभा करावा, असा मतप्रवाह भाजपमध्ये पुढे येत असून, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीपाठोपाठ आता भाजपमधील हालचालीही सुरू झाल्या असल्याचे वृत्त आहे.थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या राहुल पंडित यांनी पक्षाच्या आदेशानुसार राजीनामा दिल्यानंतर आता नव्या पदासाठी निवडणूक होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रत्नागिरी नगराध्यक्ष पद रिक्त झाले असल्याचे कळवले जाईल आणि त्यानंतर राज्यातील इतर जागांसोबतच रत्नागिरी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लागेल.
लोकसभा निवडणुकीत रत्नागिरीत दणदणीत बहुमत मिळाले असल्याने शिवसेनेने नगराध्यक्ष निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या निवडणुकीसाठी शिवसेना सर्वात उत्साही आहे. तीन महिने प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम पाहणारे प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांचेच नाव शिवसेनेकडून सर्वात पुढे राहण्याची शक्यता आहे.शिवसेनेला टक्कर देण्यासाठी आता राष्ट्रवादी, स्वाभिमान, काँग्रेस हे पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. कुवारबाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना विरूद्ध इतर सर्व पक्ष असा पॅटर्न राबवला गेला. त्यात शिवसेनेला चांगलाच फटका बसला. रत्नागिरी नगराध्यक्ष निवडणुकीतही असाच पॅटर्न राबवण्याची तयारी केली जात आहे. पाच वर्षांसाठी निवडून दिलेल्या उमेदवाराकडून शिवसेनेने दोन वर्षातच राजीनामा घेतला, हाच मुद्दा प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवण्याचीही तयारी सुरू आहे.राष्ट्रवादीप्रमाणेच आता भाजपमध्येही अंतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. लोकसभेसाठी युती झाल्यानंतरही कुवारबावमध्ये शिवसेनेसोबत न जाता भाजप आघाडीसोबत राहिली होती. त्यामुळे नगर परिषदेबाबतही तोच निकष लावला जावा, असा सूर भाजपमधून पुढे येत आहे.
विद्यमान आमदार शिवसेनेचे असल्याने विधानसभा निवडणुकीत ही जागा भाजपला न मिळता शिवसेनेला दिली जाईल, अशी शक्यता आहे. खासदारकी शिवसेनेकडे, आमदारकी शिवसेनेकडे आणि नगराध्यक्ष पदासाठीही भाजपने फक्त शिवसेनेचा प्रचार करण्याचीच भूमिका घ्यायची का, असा प्रश्न कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजपने आपला उमेदवार उतरवावा, अशी मागणी पुढे आली आहे.भाजप बाजुलाचलोकसभेत युती करण्याची घोषणा झाल्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेत भाजपला सत्तेत सामावून घेण्याचा मुद्दा पुढे आला होता. मात्र, अजून त्याबाबत काहीच हालचाली झालेल्या नाहीत. आता उपनगराध्यक्ष पद रिक्त होणार असले तरी सेनेतीलच दोन ज्येष्ठ नगरसेवक पदासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे भाजपला उपनगराध्यक्ष पद मिळू शकणार नाही. मग युती करून सेनेपाठोपाठ फरपटत जाण्यापेक्षा स्वतंत्रपणे लढणे चांगले, अशी भूमिका मांडली जात आहे.भाजपच वाढवते शिवसेना?भाजपचे वरिष्ठ पदाधिकारीच रत्नागिरीत शिवसेना वाढवत असल्याचा आक्षेपभाजपांतर्गतच घेतला जात आहे. पक्षाकडून आलेला कोणतेही कार्यक्रम न राबवता भाजपमधील संघटना वाढीकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि त्यामुळेच शिवसेना वाढत आहे. त्यापेक्षा स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणे पक्षासाठी हिताचे ठरेल, असा मुद्दा पक्षातील वरिष्ठांकडे मांडण्याची तयारीही करण्यात आली आहे.