रत्नागिरी : येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयातर्फे शहरात लागू केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मिठाई विक्रेते, किराणा दुकान आदी आस्थापनांवर कारवाई सुरू झाली आहे. मारुती मंदिर येथील हिरापन्ना मिठाईवाला तसेच त्याजवळील एक हॉटेल यांच्याकडून प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाल्याने आस्थापना बंद करण्याचे निर्देश देऊन प्रत्येकी ११,००० रूपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.
शहरातील गजानन स्वीट्स अँड कोल्ड्रिक्स येथे ग्राहकांची गर्दी झाल्याने दुकान बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे एस. टी. स्टँडजवळील राधेश्याम स्वीटमार्ट, रुची स्वीटमार्ट व स्वरूप स्वीटमार्ट यांच्याकडेही गर्दी असल्याने शासन नियमाच्या उल्लंघनामुळे दुकान बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील गोखले नाका येथील हनुमान स्वीटमार्ट यांच्याकडूनही नियमांचे उल्लंघन झाल्याने दुकान बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. ही कारवाई जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यापुढेही अशाच प्रकारची कारवाई घेण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या येथील कार्यालयाचे सहायक आयुक्त नारगुडे यांनी सांगितले. सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न पदार्थ पुरवठा करताना कर्मचाऱ्यांमार्फत घरपोच सेवेचा पर्याय वापरावा व घरपोच सेवा देणाऱ्या व अन्न पदार्थ हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी किंवा लसीकरण करून घेणे बंधनकारक असल्याचे सांगून सर्व व्यावसायिकांनी वरील तरतुदीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.