आॅनलाईन लोकमतरत्नागिरी , दि. २१ : नेत्यांमधील अंतर्गत लाथाळ्या व गटबाजीमुळे कॉँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्षपद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे कॉँग्रेस कार्यकर्त्यांची मोठीच कोंडी झाली आहे. वरिष्ठ नेतेही जिल्हाध्यक्ष पदाबाबत कोणताही निर्णय घेत नसल्याने जिल्ह्यात कॉँग्रेस पक्ष मोडीतच काढायचा प्रयत्न सुरू आहे का? असा प्रश्न जिल्ह्यातील कॉँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. नेत्यांमधील अंतर्गत वादामुळे दोन वर्षांच्या काळात कॉँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी अन्य पक्षांची वाट धरली आहे.जिल्हाध्यक्षांची नियुक्ती दोन दिवसात न केल्यास जिल्ह्यातील कॉँग्रेसजन त्यांच्या पदांचे राजीनामे देतील, असा इशारा २१ मार्च रोजी जिल्ह्यातील कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कॉँग्रेसभवन येथील पत्रकार परिषदेत दिला होता. हा इशारा देण्यामागे कार्यकर्त्यांचा उद्देश नक्कीच प्रामाणिक होता. त्यामुळे त्यांनी राजीनामे देणे न देणे हा वेगळा विषय आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये केवळ माजी खासदार नीलेश राणे यांचे समर्थक होते, असे मानण्याचे कारण नाही. राणे यांनी या विषयावर मार्ग काढण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील असंख्य कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी आपापल्या पदांचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. दोन वर्षे पक्षाला जिल्हाध्यक्ष नाही तरीही कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम सुरु ठेवले आहे. यातून अजूनही सामान्य कार्यकर्त्यांना कॉँग्रेसचे अस्तित्व टिकून राहावे, असे वाटते. जिल्ह्यात कॉँग्रेसकडे कार्यकर्ते आहेत, मात्र नेतृत्व नसल्याने त्यांची स्थिती दिशाहीन जहाजासारखी झाली आहे. जिल्ह्यातील कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत कॉँग्रेसच्या वरिष्ठांना आतातरी पक्षाला जिल्हाध्यक्ष द्या, असा संदेश दिला होता. आपल्या पदांचा राजीनामा देणार असल्याचा इशारा देऊन कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मात्र, त्यांच्या या मागणीला अजूनही वरिष्ठांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील उरल्यासुरल्या कॉँग्रेसजनांमध्येही नैराश्याचे वातावरण आहे. जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांमधील कॉँग्रेस कार्यकर्त्यांना न्याय हवा आहे. त्यामुळेच जिल्हाध्यक्ष द्या, अन्यथा सर्व तालुक्यातील कॉँग्रेसचे पदाधिकारी सामुहिक राजीनामे देतील, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला होता. या इशाऱ्याला आता तीन महिन्यांचा कालावधी होत आला, तरीही वरिष्ठांनी मागणीची दखल न घेतल्याने जिल्हा कॉँग्रेसमध्ये संतापाची भावना आहे. जिल्हाध्यक्षपद नियुक्तीबाबत सर्व कॉँग्रेस कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन लवकरात लवकर मार्ग काढण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.
रत्नागिरी कॉँग्रेसला दोन वर्ष जिल्हाध्यक्षच नाही
By admin | Published: June 21, 2017 4:10 PM