रत्नागिरी : राज्य विधानसभा तसेच लोकसभा निवडणूक २०१९मध्ये होणार असल्याने राजकीय पक्षांमध्ये नेत्या कार्यकर्त्यांची ये-जा सुरू झाली आहे. केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार असल्याने जिल्ह्यातील कॉँग्रेस तसेच अन्य पक्षांमधील नेते आता भाजपच्या वाटेवर आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या रत्नागिरी दौऱ्यात कॉँग्रेसमधील नाराज पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन खलबते केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.भाजपचे रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूकप्रमुख म्हणून आमदार प्रसाद लाड यांच्याकडे पक्षाने जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर आमदार लाड यांचा या लोकसभा मतदासंघातील संपर्क वाढला आहे. दोन्ही जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठकही लाड यांच्या उपस्थितीत घेण्यात आली आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना भाजपकडून या लोकसभा मतदारसंघात आखण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची ताकद अन्य पक्षांच्या तुलनेत कमी आहे. रत्नागिरीच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची स्थिती चांगली आहे. तेथे भाजपचे १०० सरपंच आहेत, तर रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचे ९०० ग्रामपंचायत सदस्य असल्याचेही पक्षाकडून सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यात भाजपकडे कार्यकर्त्यांचे किमान बळ आहे तसेच जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेववक संघाची विणही बऱ्यापैकी घट्ट आहे. मात्र, पक्षाकडे तुलनेत सक्षम नेत्यांची कमतरता आहे. त्यामुळेच भाजपची स्थिती निवडणुकीआधी भक्कम करून सेनेला धोबीपछाड देण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.येत्या निवडणुकांआधी भाजप या दोन्ही जिल्ह्यात भक्कम करण्यासाठी पक्षातर्फे जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. आता या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार लाड यांच्याकडे देण्यात आल्यानंतर त्यांच्या संपर्क दौऱ्यावेळी भाजपमध्ये प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी लाड यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.आमदार लाड यांनी लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर येत्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातून ८पैकी ६ आमदार भाजपचे विजयी होतील व येथील खासदारही भाजपचेच असतील, असा दावा केला आहे.
येत्या काही महिन्यात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात अन्य पक्षातील नेत्या - कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील नाराज भाजपमध्ये जाणार नाहीत, यासाठी त्या पक्षाच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.लाड यांच्याशी गुप्त चर्चारत्नागिरी जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या काही जिल्हास्तरीय नेत्यांनी, जुन्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरीत आमदार लाड यांची भेट घेतली व त्यांच्याशी गुप्त चर्चा केली. त्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कॉँग्रेससह अन्य पक्षांमधील नाराज नेत्यांनीही लाड यांची भेट घेतल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.