रत्नागिरी : गेल्या तीन वर्षांपासून जिल्हाध्यक्ष सापडत नसलेल्या कॉँग्रेसला आता जिल्ह्यातील पक्षाच्या अस्तित्त्वासाठी धडपड करावी लागत आहे. जिल्हाध्यक्ष निवडीसाठी कार्यकर्त्यांनी फोडलेला टाहो राज्यस्तरीय नेत्यांच्या कानात अद्याप घुमलेला नाही, अशी कार्यकर्त्यांची जळजळीत प्रतिक्रीया आहे. आता नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांची भूमिका जाणून घेण्यासाठी कॉँग्रेसचे १० ते १५ खासदार नाणारला भेट देणार आहेत. त्यातून जिल्ह्यातील कॉँग्रेसचे अस्तित्व जपण्याची धडपड सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.तीन वर्षांपूर्वी रमेश कीर यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कॉँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सातत्याने सुरू असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. प्रत्यक्षात हे चित्र कागदावर अजूनही उतरलेले नाही व उतरले असेलच तर ते केवळ कागदावरच आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. नवीन अध्यक्ष मिळावा म्हणून बराच काळ प्रतीक्षा करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसात काँग्रेसची साथ सोडून आपल्या हाती धनुष्यबाण, कमळ घेतले आहे. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची स्थिती केविलवाणी आहे.गेल्या दोन वर्षांच्या काळात कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी सातत्याने प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे जिल्हाध्यक्ष मिळावा, यासाठी दबाव आणला. काही नावेही दिली व त्यातून तुम्हीच जिल्हाध्यक्ष निवडावा, असेही सुचविण्यात आले.
पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेनुसार ही निवड व्हावी, यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. कॉँग्रेसमध्ये असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे यांनीही जिल्हाध्यक्षपद नियुक्तीबाबत आग्रही भूमिका घेतली. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे राणे यांनी स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढला.
राणे यांचे कॉँग्रेसमधील समर्थक स्वाभिमान पक्षात गेल्याने कॉँग्रेसची ताकद आणखीच कमी झाली. परंतु जिल्ह्यातील व प्रदेशवरील नेत्यांनी ही वस्तुस्थिती मान्य न करता आता कॉँग्रेस बळकट झाली, असे सांगून आपली पाठ थोपटून घेतल्याची चर्चाही कार्यकर्त्यांमध्ये आहे. एवढे झाल्यानंतरही जिल्हा कॉँगे्रेसला बळ देण्यासाठी जिल्हाध्यक्षपद देण्यात आले नाही. तीन वर्षे जिल्हा कॉँग्रेसला कोणी वाली नाही. सहा महिन्यांपूर्वी जिल्हा प्रभारी म्हणून कॉँग्रेसने विश्वनाथ पाटील यांची नियुक्ती केली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष निवडीची आशा निर्माण झाली होती, मात्र ती आशा मावळली आहे.जिल्हाध्यक्षपदासाठी नावे चर्चेतविजय भोसले, अशोक जाधव, सदानंद गांगण, सुधीर दाभोळकर यांची नावे जिल्हाध्यक्षपदासाठी पुढे करण्यात आली होती. त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. प्रभारी पाटील यांच्या शब्दाला प्रदेशस्तरावर कोणतेही वजन नाही, असेच स्पष्ट झाले. त्यामुळे प्रभारी नियुक्ती हा फार्स होता काय, अशी चर्चाही आता कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.नाणारचा झेंडा तारणार?नाणारला होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प हा राजापूर तालुक्यात आहे. कॉँग्रेसचे खासदार हे या प्रकल्पाच्या ठिकाणी स्थानिकांशी चर्चा करणार आहेत. प्रकल्पविरोधकांनी हाती घेतलेला विरोधाचा झेंडा हाती घेणार आहेत. परंतु विरोधाचा हा झेंडा हाती घेण्यासाठी जिल्ह्यातून कार्यकर्त्यांचे पाठबळ किती आहे व यातून जिल्हा कॉँगे्रसला कशी बळकटी येणार, असा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सवाल आहे.