अरुण आडिवरेकररत्नागिरी : ते राज्याचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री आहेतच, शिवाय नुकतेच त्यांनी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपदही स्वीकारले आहे. एका आॅर्गनच्या (हार्मोनियम) वर्कशॉपला त्यांनी भेट दिली आणि चक्क नांदी ऐकवण्याची फर्माईश केली. सादर झालेले नमन नटवरा... मनापासून ऐकून तेही खूश झाले. हा किस्सा आहे राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील. सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांची ही फर्माईश पूर्ण केली आॅर्गननिर्माते बाळ दाते यांनी.आडिवरे (ता. राजापूर) येथे उभारण्यात आलेल्या तावडे अतिथी भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे आले होते. तावडे अतिथी भवनचे उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी आडिवरे येथील बाळ दाते यांच्या आॅर्गनच्या वर्कशॉपला भेट दिली.
या भेटीत अनेक वर्षांचे असलेले नाट्यसंगीत आणि आॅर्गन यांचे नाते जाणून घेत दाते यांच्याकडून आॅर्गन तयार करण्याबाबतची तपशिलवार माहिती जाणून घेतली. या भेटीदरम्याने विनोद तावडे यांनी सांगितले की, अमेरिकेत जे आॅर्गन बंद पडले ते भारतात आणि विशेषकरून कोकणात तयार होत आहे. हे आॅर्गन अमेरिकेतील लोक येथून घेऊन जात आहेत, ही अभिमानाची बाब आहे. विशेषत: आॅर्गन आणि पेटी यात फरक आहे. आॅर्गनमध्ये एक वेगळीच गोडी आहे, असे सांगितले.आॅर्गनबाबतचे बारकावे जाणून घेत असतानाच ते म्हणाले, ह्यह्य कालच ९८व्या नाट्यसंमेलनाचा स्वागताध्यक्ष झालो आहे. अध्यक्ष म्हणून कीर्ती शिलेदार या आहेत. त्या नाट्य संगीतातील एक चांगल्या जाणकार आहेत. त्यामुळे आपल्याला नांदी ऐकायला आवडेल, असे त्यांनी सांगितले. सांस्कृतिक मंत्र्यांनी नांदीची फर्माईश करताच बाळ दाते यांची बोटे आॅर्गनवर फिरू लागली. नमन नटवरा या नांदीचे सूर ऐकून खूश झालेल्या विनोद तावडे यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.आॅर्गन संशोधनासाठी सर्वतोपरी मदतआॅर्गनमध्ये बाळ दाते भरपूर संशोधन करावे. मुंबईतील आयआयटी असेल किंवा अन्य कोणतीही मदत असेल ती शासन म्हणून आपण निश्चितच करू. आॅर्गन संशोधनासाठी शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन तावडे यांनी दिले.