लांजा : मुसळधार पावसासह आलेल्या वादळी वाऱ्याने तालुक्यातील कोंडगे गावातील हायस्कूलची इमारत व अनेक घरांवर झाडे पडल्याने लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. महसुल विभागच्यावतीने पंचनामे करण्यात आले आहेत.तालुक्यातील पुर्व भागातील कोंडगे गाव परिसरात मुसळधार पावसासह वादळ आले होते. या वादळाने रामेश्वर विद्यालयाच्या दोन वर्गावरती एक झाड पडले छप्पर तुटल्याने विद्यालयाचे १ लाख ४८ हजार आठशे रुपयांचे नुकसान झाले आहे.
घरावर झाड पडुन गणपत आत्माराम पडवळ यांचे ७२ हजार दोनशे २० रुपये, निता निवृत्ती विश्वासराव यांचे १९ हजार पाचशे, मेघा मंगेश कदम यांचे १६ हजार सहाशे ५ रुपये, जयभिम सखाराम जाधव यांचे १५ हजार सहाशे ६० रुपये, महेश विठोबा विश्वासराव यांचे ५७ हजार सहाशे ६० रुपये आणी सुरेश रामचंद्र बारस्कर यांचे ५ हजार ५० रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान, वादळामुळे झालेल्या नुकसानीचे महसुल विभागाकडुन पंचनामे करण्यात आले आहेत. पंचनाम्यावरुन कोंडगे गावात एकूण ३ लाखांचे नुकसान झाले असल्याचे महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.