दापोली : दापोली उपजिल्हा रूग्णालयात आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असली तरी आॅक्टोबर २०१६पासून या रूग्णालयाचा कारभार प्रभारींच्याच हाती आहे. मात्र, तरीही आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेताना येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रूग्णालयाचा दर्जा मात्र अजिबात घसरू दिलेला नाही.
या रूग्णालयाला वैद्यकीय अधीक्षक पदासह इतर कर्मचाऱ्यांसाठी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे, असा प्रश्न सर्वसामान्य रुग्ण व दापोलीवासियांकडून विचारला जात आहे.दापोली उपजिल्हा रूग्णालयासाठी मंजूर एकूण ४६ पदांपैकी ३४ पदे सध्या भरण्यात आली असून, वैद्यकीय अधीक्षक वर्ग १ या मुख्य पदासह तब्बल १२ पदे आजही रिक्तच आहेत. त्यामुळे वर्ग २ चे वैद्यकीय अधिकारी हे प्रभारी म्हणून गेली पावणेदोन वर्षे उपजिल्हा रूग्णालयाचे काम पाहत आहेत.
या पावणेदोन वर्षात येथे कार्यरत प्रभारींनी उत्तम काम करून शासनाकडून देण्यात येणारा डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळवून दापोली उपजिल्हा रूग्णालयाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे.
दापोली उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जरी चांगले काम केले असले, तरी दररोज बाह्यरुग्ण विभागात होणारी रूग्णांची गर्दी पाहता याठिकाणी कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यावर कामाचा ताण पडत असून, त्यांच्याही मानसिकतेचाही विचार करणे गरजेचे आहे.
दापोली उपजिल्हा रूग्णालयात कायमच रूग्णांची गर्दी असते. याठिकाणी अपुरे कर्मचारी असल्याने काहीवेळा सेवेतील त्रुटींमुळे रूग्णांसह त्यांच्याबरोबर आलेल्या नातेवाईकांचे येथील वैद्यकीय अधिकारी वा कर्मचाऱ्यांशी या ना त्या कारणाने खटके उडताना पाहायला मिळतात. मात्र, यावेळी रूग्णालयातील अधिकारी वा कर्मचारी हे कायमच संयमी भूमिका बजावताना दिसतात.दापोली उपजिल्हा रूग्णालयातील कामकाजाच्या वार्षिक आकडेवारीकडे पाहता, या रूग्णालयात कायम रुग्णांची गर्दी असल्याचे दिसून येईल. या रुग्णालयातील रिक्त पदे का भरली जात नाहीत? असा प्रश्न रुग्णांकडून विचारला जात आहे.
उपजिल्हा रूग्णालयात दापोलीसह मंडणगड, खेड आणि काही प्रमाणात गुहागर तालुक्यातील रूग्ण आरोग्य तपासणी व उपचार घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे येथे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडतो. त्यामुळे या रुग्णालयातील रिक्त पदे त्वरित भरून रूग्णालय अधिक सक्षम करावे, अशी मागणी होत आहे.रूग्णांना सेवा देताना तारेवरची कसरतदापोली उपजिल्हा रुग्णालयात सन २०१५-१६मध्ये ८० हजार २४६ रूग्णांनी तपासणी करून घेतली. त्यामधील ६ हजार ८९० रूग्णांना अधिक उपचारासाठी रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले. तसेच १ हजार २६ महिलांच्या प्रसुती करण्यात आल्या. त्यामध्ये ३१५ सिझर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
याव्यतिरिक्त श्वानदंश ४७२, सर्पदंश ३४५, विंचूदंश २३५ तर सन २०१६-१७मध्ये बाह्यरुग्ण ५९ हजार १८१, आयपीडी ६ हजार १२०, श्वानदंश ११९८, सपदंश २७३, विंचूदंश २४९, प्रसुती ९७६, सिझर २९६, शवविच्छेदन ६६, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ४८१ त्याचप्रमाणे सन २०१७-१८मध्ये बाह्यरुग्ण १० हजार ५०५, आयपीडी ५ हजार ७६९, विंचूदंश २८६, श्वानदंश ९९१, सर्पदंश २९८, प्रसुती ६४३ सिझर १८६, शवविच्छेदन ५१, कुटुंब नियोजनाच्या ३९८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.अ३३ंूँेील्ल३२