चिपळूण : परमेश्वराची भक्ती करताना अनंत यातना भोगाव्या लागतात. भक्तीच्या माध्यमातून परमेश्वराला प्राप्त करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. हा मार्ग काट्याकुट्याचा असतो. परंतु, आपल्या परमेश्वरासाठी मन एकाग्र करुन निस्सीम भक्ती भक्त करतो आणि भगवंतही भक्तीचा भुकेला असल्याने आपल्या भक्ताला न्याय देतो. हाच भक्तिचा महिमा तुळजापूरची तुळजाभवानी या वगनाट्यातून चेंदवणकर - गोरे पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, कवठी, ता. कुडाळ या दशावतार मंडळाने दाखवून चिपळूणकरांना मंत्रमुग्ध केले.पारंपरिक कोकणी विशेषत: मालवणी ढंगात सादर केले जाणारे दशावतार नाट्य आता मराठी भाषेत सादर केले जात असल्याने येथील नागरिकांनाही त्याची नशा चढू लागली आहे. तुळजापूरची तुळजाभवानी हा नाट्यप्रयोग पाहण्यासाठी गर्दी उसळली होती.
तालासुरात हा नाट्यप्रयोग रंगत असल्याने येथील रसिकांनाही तो आता आवडू लागला आहे. राज्य शासनाने सुरु केलेल्या या महोत्सवाची येथील जबाबदारी संचालक संजय पाटील व प्रसिध्दीप्रमुख प्राजक्ता आयरे-साटम हे उत्तमरित्या हाताळत आहेत. शासनाचा कार्यक्रम आता अधिक प्रकाशात येऊ लागला आहे.तुळजापूरची तुळजाभवानी या नाट्यप्रयोगात करवीर नगरीचा राजा करवीरासूर याची व देवाची लढाई झालेली असते. देव व दानव यांच्यातील या लढाईत देवांनी दानवांच्या हद्दीत प्रवेश करायचा नाही व दानवांनी देवाच्या हद्दीत प्रवेश करायचा नाही, असा करार झालेला असतो. असे असतानाही करवीर नगरीत ईश्वर नामाची भक्ती केली जाते.सुंदर आणि रुपा या पती-पत्नीला परमेश्वराची भक्ती करताना करवीरासूर पाहतो आणि त्याचे पित्त खवळते. नारदमुनी त्याला डिवचतात, त्यामुळे तो थेट देवसभेत जातो व आपण करार मोडून येथे का आलो? याचे कारण महाविष्णूला सांगतो. आपल्या राज्यात कुणीही भक्ती केली तरी त्याला मदत करू नका, असे सुनावतो. त्यानंतर
सुंदर व रुपाचे हालहाल करुन सुंदरला तो ठार मारतो व त्याची पत्नी अपंग रुपाला कोठडीत डांबतो. सुंदर हा आंधळा, भिकारी असतो. त्याला रुपा नेहमी सांगते की मी सुंदर आहे. मात्र, प्रत्यक्षात शुक्राचार्याच्या आशीर्वादाने त्याला दृष्टी मिळते, तेव्हा हे सुंदर जग पाहताना त्याला आनंद होतो. मात्र, नेहमी सौंदर्याचे गुणगान गाणाऱ्या आपल्या पत्नीचा चेहरा पाहून तो निराश होतो व आपल्या पत्नीचा त्याग करतो. ज्याची पती परमेश्वर म्हणून सेवा केली त्या पतीने लाथाडल्यानंतर रुपाने देवीचा धावा सुरु केला आणि देवीने प्रसन्न होऊन तिची मनोकामना पूर्ण केली.