चिपळूण : चिपळूण येथे सुरू असलेल्या दशावतारी नाट्य महोत्सवात तिसऱ्या दिवशी श्री वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ, तेंडोली यांच्या रक्षक झाला राक्षस या दशावतारी नाट्यप्रयोगाने धमाल उडवून दिली. मातृ देवो भव:, पितृ देवो भव:, आचार्य देवो भव: याची महती सांगत सामान्य जीवनात कसे जगावे, याचे महत्त्व पटवून देतानाच आईची महती अधिक ठळकपणे या प्रयोगात मांडण्यात आली.वैद्यबुवा व त्यांच्या पत्नीच्या कॉमेडीने हास्याचे कारंजे फुलले. नाट्यप्रयोगातील हा भाग मनाला ताजेतवाने करुन गेला. त्यामुळे नाट्यप्रयोगाची उंची अधिक वाढली. वैद्यबुवांचा अभिनय करणारे मंगेश साटम व त्यांच्या पत्नीची भूमिका साकारणारे विनायक सर्वेकर हे भाव खाऊन गेले. सर्वेकर यांचा ब्राह्मणही तितकाच उठावदार होता. तर त्यांची ब्राह्मण पत्नी म्हणून नारायण कुंभार यांनी रंगत आणली. योगेश कोंडुसकर यांचा नारद अधिक प्रभावी वाटला.सृष्टीच्या चराचरात परमेश्वराचा वास आहे, त्याचे अस्तित्व सर्वांच्यात आहे, परमेश्वर सर्वांच्या अंतरंगी सामावलेला आहे. त्यामुळे आपण सर्व एक आहोत, असा संदेश या नाट्यप्रयोगातून देण्यात आला. राजा मित्रसह त्यांची भूमिका करणारे विघ्नराजेंद्र कोंडुसकर यांची प्रभावी शब्दफेक, शुध्द उच्चार व न डगमगता केलेले स्वगत अधिक लक्षवेधी होते. त्यांची राणी दमयंती यांची बबली धुरी यांनी साकारलेली भूमिकाही यथायोग्य होती.
अमित परब व नारायण प्रभू यांचा नरराक्षस संपूर्ण प्रयोगावर छाप पाडून गेला. आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी आसुसलेला नरराक्षस नाना प्रभू यांनी ताकदीने रंगवला. वशिष्टमुनींची भूमिका मेघश्याम सर्वेकर, आचारी सुमंत थोरबोले, गणपती प्रसाद भाईप व रिध्दीसिध्दी दिनेश मांजरेकर यांनी चांगली साथ दिली. हार्मोनियम साथ पराग प्रभू, मृदुंगमणी प्रकाश राऊळ, महादेव चव्हाण, चंद्रकांत परब, संदीप गावडे यांनी उत्तम सहकार्य केले.