आरवली : संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णाला मुदत संपलेले सलाईन लावल्याची तक्रार पोलीस महासंचालकांकडे करण्यात आली आहे. तालुका आरोग्य अधिकारी आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने कारवाईबाबत चालढकल करुन दोषी डॉक्टरला पाठीशी घातल्यानेच ग्रामपंचायत सदस्य महेश बाष्टे यांनी याविषयीची तक्रार थेट पोलीस महासंचालकांकडे केली आहे.माखजन प्राथमिक आरोग्य केंद्रात मुदत संपलेले सलाईन रुग्णांना लावले जात असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य महेश बाष्टे यांना रुग्णांकडून मिळाली होती. त्यानुसार २६ जुलै रोजी बाष्टे तसेच सरंद येथील ग्रामस्थ प्रभाकर गोटेकर यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन पाहणी केली असता, याठिकाणी एका महिला रुग्णाला मुदत संपलेले सलाईन लावल्याचे दिसून आले.
त्या सलाईनवरील मुदतीचा कालावधी मार्करने खोडण्यात आल्याचे बाष्टे यांच्या निदर्शनाला आले. खात्री केली असता, सलाईनची मुदत संपली असल्याचे दिसून आले.त्यानंतर याची माहिती माखजन सरपंच दीपा खातू यांना देण्यात आली. ३१ जुलै रोजी सरपंच खातू, सरंदचे सरपंच समीर लोटणकर, पोलीसपाटील नंदन भागवत, रुपेश गोताड यांच्यासह ग्रामस्थ माखजन आरोग्य केंद्रात गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावेळी या केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना याठिकाणी दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी मुदतबाह्य सलाईन व औषधे वापरली जात असल्याचे सांगण्यात आले.
यावर बैद्यकीय अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तर न देता, उलट उपस्थित ग्रामस्थांनाच धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांना दूरध्वनीवरुन याबाबत कल्पना दिल्याचे बाष्टे यांनी सांगितले.त्यावेळी पोलीस कर्मचारी संदीप जाधव यांच्याकडे याबाबतचा तक्रार अर्ज ग्रामस्थांनी सादर केला. त्यानंतर जाधव यांनी दवाखान्यात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, रुग्णाला वापरण्यात आलेली मुदतबाह्य सलाईनची एक बाटली सापडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मात्र, पोलिसांनी या बाटलीचा पंचनामा न करता, ती ताब्यात घेतली असून, आपल्या तक्रार अर्जाची पोचही दिली नसल्याचा आरोप बाष्टे यांनी केला आहे. आरोग्य विभाग व पोलीस यांनी याप्रकरणी चालढकल केल्यानेच आता पोलीस महासंचालकांकडे आपण तक्रार दिली असून, त्यासोबत सर्व पुरावेही सादर केल्याची माहिती बाष्टे यांनी दिली.