मंडणगड : जिओ कंपनीचे केबल कामासाठी तालुक्यात आलेल्या कामगाराच्या ९ वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना ३ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्याने भारजा नदीपात्रात घडली. बंटी प्रकाश शिंदे (९, सध्या रा. दहागाव झोपडपट्टी, मूळ गाव वाघी घानोरा, तालुका जिंतूर, जि. परभणी) हा शौचास गेला असता, त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.त्याच्या नाकातोंडावाटे पोटात पाणी शिरल्याने तो बेशुध्द झाला. रुग्णालयात दाखल केले असता, तो मयत झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत सावळरा टिप्पा शिंदे (४८, सध्या रा. दहागाव झोपडपट्टी) यांनी मंडणगड पोलीस स्थानकात माहिती दिली.
बंटी हा ३ मे रोजी पालघर येथे दुपारी तीन वाजता भारजा नदीपात्रात नैसर्गिक विधीसाठी गेला होता. यावेळी पाय घसरुन नदीपात्रात पडल्याने बेशुध्द झाला.त्याला अधिक उपचारांसाठी रुग्णालयात नेले असता, तो त्याआधीच मयत झाला होता. त्याच्या पार्थिवाचे विच्छेदन दापोली येथील रुग्णालयात करण्यात आले. मंडणगड पोलीस स्थानकातील पोलीस नाईक श्रीकांत बुरोंडकर याबाबत अधिक तपास करीत आहेत.