सचिन मोहितेदेवरुख : देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारांनी लढत देण्याचे निश्चित केल्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार अनघा कांगणे यांना मिळणारी मते ही अन्य उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. प्रत्यक्षात मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, हे १२ रोजीच स्पष्ट होणार आहे.नगराध्यक्ष पदासाठी भाजप - मनसे - आरपीआय महायुतीकडून मृणाल शेट्ये उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादी - काँग्रेस - जनता दल - बहुजन विकास आघाडी - कुणबी सेना या महाआघाडीकडून विद्यमान नगरसेविका स्मिता लाड या नगराध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार आहेत. शिवसेनेकडून धनश्री बोरूकर व स्वाभिमान पक्षाकडून विद्यमान नगरसेविका मिताली तळेकर निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.या चारही उमेदवारांसह अपक्ष उमेदवार म्हणून अनघा कांगणे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे कांगणे यांनी या निवडणुकीतील रंगत वाढवली आहे. शहरात सर्वच पक्षांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. यामध्ये अपक्ष उमेदवार कांगणे यांनीही आपला विकासात्मक जाहीरनामा शहरातील मतदारांसमोर मांडला आहे. कुणबी बांधवांनी अनघा कांगणे यांना उमेदवारी देत जोरदार पाठिंबा दर्शविला आहे.देवरूख नगरपंचायत कार्यक्षेत्रात कुणबी समाज मोठ्या प्रमाणात वसलेला आहे. या समाजानेच अनघा कांगणे यांना उमेदवारी दिल्यामुळे तसेच हा समाज एकसंघ राहिल्यास कांगणे या निर्णायक मते मिळवू शकतात. तर दुसरीकडे स्मिता लाड, मृणाल शेट्ये, धनश्री बोरूकर व मिताली तळेकर या उमेदवारांनीही विजयाचा दावा केला आहे.
प्रत्येक पक्षाने आपल्या मतांची ताकद यापूर्वीच्या निवडणुकांमधून आजमावलेली आहे. यात स्वाभिमान पक्षच पहिल्यांदा लढत आहे. यामुळे त्यांचे मतांचे बळ सद्यस्थितीत अस्पष्ट आहे. त्यातच अपक्ष उमेदवार अनघा कांगणे या किती मते घेतील, हे देखील सध्या गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, कांगणे जी मते पदरात पाडतील, ती मते ही अन्य पक्षांच्या उमेदवारांच्या गोटातीलच असणार आहेत.अपक्ष उमेदवार अनघा कांगणे यांची नगराध्यक्षपद निवडणुकीतील उडी अन्य सर्वच पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. शहरातील कुणबी बांधवांनी त्यांना चांगली साथ दिल्यास या निवडणुकीत कांगणे चमत्कारही घडवू शकतात, असे चित्र सध्या दिसून येत आहे.
आजवरच्या निवडणुकीत देवरुखात अपक्ष उमेदवार कधीच निवडून आलेले नाहीत. येथील मतदार हे अधिकृत पक्षाच्या उमेदवारांनाच मतदान करतात, हे आजवर झालेल्या निवडणुकांमधून दिसून आले आहे. कांगणे यांनी मागील निवडणुकीत काँग्रेस आघाडीकडून निवडणूक लढविली होती व काही महिन्यांपूर्वीच त्यांनी भाजपत प्रवेश केला होता. यामुळे त्यांना कमी लेखून चालणार नाही, याची जाणीव सर्वपक्षीय उमेदवारांना असणे गरजचे आहे.रंगत वाढलीदेवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना अर्ज बाद झाल्याचा फटका बसला होता. त्यामुळे अपक्ष उमेदवार अनघा कांगणे यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, न्यायालयाने राजकीय पक्षांना दिलासा देत हे अर्ज बैध ठरवले होते. त्यामुळे निवडणुकीत पुन्हा एकदा रंगत आली आहे. अपक्ष उमेदवार कोणाची मते घेणार?मतदारांच्या गाठीभेटीप्रत्यक्षात मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, हे १२ रोजीच स्पष्ट होणार आहे. भाजप युती व काँग्रेस आघाडीकडून उमेदवारांचे छायाचित्र असलेले रथ मतदारांना आकृष्ठ करण्यासाठी संपूर्ण शहरात फिरत आहेत. यामुळे या दोन उमेदवारांमध्ये प्रचाराची वेगळीच रंगत पाहावयास मिळत आहे. शिवसेना व स्वाभिमान पक्षाचे उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेताना घरोघर प्रचार करीत आहेत.