रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसह मृत्यूचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. जिल्ह्यात १४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, १२३ बाधित रुग्णांची भर पडली आहे, तर ९१ बाधित बरे झाले आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांत १,०७३ बाधितांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात अचानक कोरोनाबाधितांच्या मृत्यूमध्ये वाढ झाली, ही जिल्हावासीयांच्यादृष्टीने चिंताजनक बाब आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २,२८४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, रुग्णांच्या मृत्यूचा दर ३.३ टक्के इतका झाला आहे. जिल्ह्यात दापोली, लांजा तालुक्यात प्रत्येकी ३ रुग्णांचा, रत्नागिरीत ४ रुग्णांचा, गुहागर, चिपळुणात प्रत्येकी एका आणि संगमेश्वरात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात सर्वात कमी एक बाधित रुग्ण, तर रत्नागिरी तालुक्यात सर्वात जास्त ४१ रुग्ण सापडले आहेत. तसेच दापोली तालुक्यात ९, खेडमध्ये १२, गुहागरात १४, चिपळुणात २०, संगमेश्वरात २१, लांजात २ आणि राजापुरात ३ रुग्ण आढळले. आतापर्यंत एकूण ७५,४३३ रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात ७२,०७६ रुग्ण कोरोनामुक्त बनले असून, त्यांचा बरे होण्याचा दर ९५.५५ टक्के आहे. जिल्ह्यात लक्षणे असलेले २९७, तर लक्षणे नसलेले ६९४ रुग्ण आहेत.