रत्नागिरी : बारसूतील प्रस्तावित रिफायनरी प्रकरणी राज्यातील शेतकऱ्यांना हाक देणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी जिल्हा बंदीची नोटीस बजावली आहे. रत्नागिरी पोलिसांनी सोमवारी रात्री सांगली येथे जाऊन ही नोटीस बजावली.बारसू येथील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर त्यात राजू शेट्टी यांनीही उडी घेतली होती. बारसूतील शेतकरी एकटे नाहीत. वेळ पडल्यास राज्यातील सर्व शेतकरी बारसूमध्ये येतील, असा इशारा त्यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन दिला होता.
सद्यस्थितीत पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलिस यांनी बारसूतील ग्रामस्थ, रिफायनरी विरोधी संघटनांचे नेते तसेच ठाकरे शिवसेनेशी चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे किमान याविषयी चर्चा करण्याची तयारी ग्रामस्थ दर्शवत आहेत. त्यातून विरोधाचे वातावरण निवळेल, अशी अपेक्षा आहे. यात कोणतीही बाधा येऊन वातावरण बिघडू नये, यासाठी पोलिसांनी माजी खासदार शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदीची नोटीस दिली आहे.