देवरूख : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या बंदमध्ये संगमेश्वर तालुका सहभागी झाला नसल्याने बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही.
यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देवरूख- रत्नागिरी व देवरूख-लांजा मार्गावरील एस. टी.च्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. सुमारे ३० फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून देवरूख पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी पाटील व संगमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.संगमेश्वर तालुक्यातील देवरूख, साखरपा, संगमेश्वर, आरवली, माखजन, कडवई या बाजारपेठांमध्ये बंदचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. संगमेश्वर वगळता या बाजारपेठा नेहमीप्रमाणे सुरू होत्या. दर शुक्रवारी संगमेश्वर बाजारपेठ बंदच असते.देवरूख आगारातून रत्नागिरी व लांजाला जाणाऱ्या बसफेऱ्या सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे रत्नागिरी, साखरपा व लांजा येथे जाणाऱ्या विद्यार्थी व ग्रामस्थांचे मोठे हाल झाले. बंदमुळे विद्यार्थी लवकर घरी गेले.