प्रकाश वराडकररत्नागिरी : राज्यात २०१९ला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी जिल्ह्यात जोरात सुरू झाली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेस गावोगावी मेळावे घेत निवडणुकीचे वातावरण तापवत आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे तालुकास्तरावर बैठकांची मालिका सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी या राजकीय पक्षांची दौड केव्हाच सुरू झाली. मात्र, कॉँग्रेसमध्ये अजूनही सामसूमच आहे. ४ महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले रमेश कदम रत्नागिरीच्याकॉँग्रेस भुवनपासून अजूनही दूर - दूर का आहेत, याचीच चर्चा जोरात आहे.विधानसभा व लोकसभा निवडणुकांना आता अवघा वर्षभराचा कालावधी उरला आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेने केलेल्या कामांचा आढावा घेताना नव्याने काय करणार, यासाठी मतदारांच्या समोर मेळाव्याच्या रुपाने जाणे पसंत केले आहे.
पंचायत समिती गण, जिल्हा परिषद गटनिहाय जिल्ह्यात सेनेचे निवडणूक मेळावे सुरू आहेत. सेनेचे रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, राजापूरचे आमदार राजन साळवी व चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह खासदार विनायक राऊत यांनी सेनेच्या प्रचार मेळाव्यांमध्ये जागोजागी आघाडी घेतली आहे. या मेळाव्यांना गर्दी खेचण्यातही सेनेला यश येत आहे.सेनेच्या मेळाव्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही गावा-गावांत जाऊन मेळावे घ्यायला सुरूवात केली आहे. सेनेचा तगडा स्पर्धक अशी राष्ट्रवादीची जिल्ह्यात ओळख आहे. गुहागरमध्ये भास्कर जाधव व दापोली मतदारसंघात संजय कदम हे राष्ट्रवादीचे दोन लढवय्ये आमदार विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यांना सुरुवात झाली आहे. चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार शेखर निकम यांनी मतदारसंघात मेळाव्यांचा धडाका लावला आहे.राज्यात सत्तास्थानी असलेल्या भाजपला अद्याप जिल्ह्यातील पक्षाचा पाया मजबूत करता आलेला नसला तरी भाजपच्या गुप्त बैठकांना जोर आला आहे. त्याद्वारे जिल्ह्यात येत्या निवडणुकीसाठी डावपेच आखले जात आहेत. अन्य पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले असताना देशातील सर्वांत जुना व अनेक दशके केंद्र आणि राज्याच्या सत्तेत असलेला कॉँग्रेस पक्ष रत्नागिरी जिल्ह्यात मात्र अद्याप उभारी घेऊ शकलेला नाही.गेल्या तीन वर्षांपासून कॉँग्रेसला जिल्हाध्यक्ष नव्हता. हे पद रिक्त असल्याने तालुका व अन्य ब्लॉक पदेही रिक्तच होती. ४ महिन्यांपूर्वीच जिल्हा कॉँग्रेसला रमेश कदम यांच्या रुपाने जिल्हाध्यक्ष मिळाला अन कार्यकर्त्यांना हायसे वाटले. कॉँगे्रस कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु जिल्हाध्यक्ष कदम यांच्या नेतृत्त्वाखालील जिल्हा कॉँग्रेसला अद्याप भरारी घेता आली नसल्याने कार्यकर्ते नाराज आहेत.तालुकाध्यक्ष पदे रिक्तचजिल्हाध्यक्ष निवडीला चार महिने होऊनही जिल्ह्यातील ९ तालुक्यांना अजूनही तालुकाध्यक्ष मिळालेले नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून कॉँग्रेसची स्थिती ही नावाड्याविना नौका अशी झालेली आहे. जिल्हाध्यक्षपदी रमेश कदम यांची निवड ४ महिन्यांपूर्वी होऊनही तालुकाध्यक्ष पदे रिक्त आहेत.जिल्हाध्यक्ष असूनही रत्नागिरीपासून दूर !रत्नागिरी हे जिल्ह्याचे, तर चिपळूण हे राजकीय घडामोडींचे प्रमुख ठिकाण आहे. जिल्ह्याचे रत्नागिरी हे महत्त्वाचे ठिकाण असतानाही जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर गेल्या ४ महिन्यात कदम यांनी रत्नागिरीत कॉँग्रेसची एकही बैठक घेतलेली नाही. त्यामुळे रत्नागिरीपासून जिल्हाध्यक्ष कदम दूर का राहात आहेत, त्यांच्या मनात कशाबद्दल भीती आहे काय, याचीच चर्चा रंगली आहे.