रत्नागिरी : अरबी समुद्र व उत्तर महाराष्ट्राच्या परिसरात झालेल्या चक्राकार वाऱ्यामुळे कोकणात वादळी वाऱ्यासह धुवाँधार पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली, विद्युत खांब उन्मळून पडले आहेत.
पावसामुळे कोकणातील नदीनाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पहाटेपासून पावसाचा जोर वाढला असून, महामार्गावरील बावनदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने वाहतूक थांबवली आहे.
गेल्या काही दिवसापासून कोकणातील काही भागात पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, सोमवारपासून जिल्ह्यात वादळीवाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे.चोवीस तास होऊन गेले तरी चांदेराई बाजारपेठेतील पाणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. मंगळवारी सकाळी बाजारपेठेत पाणी शिरण्यास सुरुवात झाली ते दुपारी १२ वाजेपर्यंत पाण्याची पातळी वाढत होती. रात्री ओहोटीच्या वेळेस रात्री १ वाजल्यानंतर थोडे पाणी कमी झाले. परंतु आता पुन्हा पहाटे ६ वाजता अचानक पुन्हा पाण्याचा वेग वाढला असून, पाण्याची पातळी अधिक असून, पाणी खूप वेगात वाढत असल्याने चांदेराई, हरचिरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.राजापूर शहरातील अर्जुना नदीवरील पूल धोकादायक असल्याने मंगळवारी रात्रीपासून मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर शहरातील अर्जुना नदीवरील पूल धोकादायक असल्याने मंगळवारी रात्री आठ वाजता पुलावरी वाहतूक बंद करण्यात आली होती.