रत्नागिरी : जिल्ह्याच्या विविध भागात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. यामुळे काल, शनिवारी रात्रीपासून नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली असून, परिसरातील गावात भीती निर्माण झाली आहे. दापोलीतील कोडजाई नदीच्या पुराचे पाणी नागरी वस्तीत घुसल्याने जालगावात ३५ घरांना धोका निर्माण झाला आहे. काही घरांत पाणी घुसले. संगमेश्वर बाजारपेठेत आज, रविवारी सकाळी पुराचे पाणी घुसल्याने व्यापारीवर्गाची धावपळ उडाली. चिपळूण तालुक्यातील टेरवमध्ये वृद्ध वहाळात वाहून गेला. राजापूर शहरातील जवाहर चौकापर्यंत पुराचे पाणी शिरल्याने भीतीचे वातावरण आहे. संगमेश्वर तालुक्यात आज, रविवारी सकाळपर्यंत ११५.५८ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली असून, धुवांधार झालेल्या पावसाने नदीकाठची शेती वाहून गेली. संगमेश्वर बाजारपेठेत सकाळपासून पुराचे पाणी शिरले. सकाळी ११ वाजेपर्यंत बाजारपेठेतील पाणी ओसरले नव्हते. त्यामुळे पाणी वाढण्याच्या भीतीने व्यापाऱ्यांना त्यांच्या दुकानांतील माल अन्यत्र हलवावा लागला. संगमेश्वरातून असुर्डेला जाणाऱ्या पुलाभोवती पाण्याचा वेढा होता. त्यामुळे वाहतूक बंद होती. तालुक्यात अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे. संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी बसथांब्यानजीक संगमेश्वर देवरुख राज्य मार्गावर पहाटे भला मोठा वृक्ष रस्त्याच्या मधोमध कोसळल्याने सुमारे तीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. गुहागर शहरातही अतिवृष्टीने कहर केला. त्यामुळे येथील प्रताप गोयथळे यांच्या घरात पाणी शिरले. पाणी घरात शिरल्याने चारजणांचे सुमारे १ लाख ९ हजार रुपयांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळून पडल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. रत्नागिरी तालुक्यालाही अतिवृष्टीने तडाखा दिला आहे. तालुक्यातील विविध भागांतील शेती पाण्याखाली गेली आहे. आधी पाऊस नव्हता म्हणून लोक चिंतेत होते. आता अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान डोळ्यांसमोर पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला. (प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा
By admin | Published: September 01, 2014 12:15 AM